‘पुढारी हेल्थ आयकॉन’ पुरस्कार : आयुष्मान भारत, ‘जनऔषधी’चा लाभ सामान्य रुग्णांना मिळावा- राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी | पुढारी

'पुढारी हेल्थ आयकॉन' पुरस्कार : आयुष्मान भारत, 'जनऔषधी'चा लाभ सामान्य रुग्णांना मिळावा- राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत आणि जनऔषधीचे उपक्रम सुरू केले आहेत. त्याचा लाभ डॉक्टरांनी सामान्य रुग्णांना कसा मिळेल, याचा विचार करावा. तसेच गरीब आणि असहाय्य लोकांना चांगल्यातला चांगला इलाज स्वस्तात कसा देता येईल, या दिशेने डॉक्टरांनी काम करावे. त्यातून एकालाच नाही तर अनेक डॉक्टरांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मान मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पुढारी माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील हॉटेल हयात येथे आयोजित ’पुढारी हेल्थ आयकॉन’ पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कोल्हापूर, सांगली आणि मिरज येथील ३३ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल डॉ. कोश्यारी बोलत होते. व्यासपीठावर दै. ’पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, दै. ’पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, दै. ’पुढारी’ पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, ’स्वातंत्र्यपूर्व काळात दै. ’पुढारी’ची सुरुवात कोल्हापूरमधून झाली. कोल्हापूर आणि सांगलीमधील जे नामांकित डॉक्टर आहेत, त्यांचा आज सन्मान करण्यात आला. त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळाला, त्यांचे अभिनंदन तर करतोच; शिवाय दै. ’पुढारी’ आणि डॉ. योगेश जाधव यांचे देखील अभिनंदन करतो. येथे उपस्थित डॉक्टर हे त्यांच्या क्षेत्रातील विशेषज्ञ तसेच ख्यातनाम आहेत. डॉ. संचेती तर अतिशय नामांकित आहेत. मी १९६२ , १९६५ आणि १९७१ चे युध्द पाहिले आहे. त्या काळात जसे सर्वांनी राष्ट्रभावनेने देशासाठी काम केले. तसेच काम कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, प्रशासन तसेच व्यावसायिकांनी केले. विशेष करून डॉक्टरांनी चांगले कार्य केले. त्यांना देखील त्यांचे हॉस्पिटल चालवायचे आहे. अद्ययावत मशिनरी आणायची आहे. त्यामुळे रुग्णांकडून कमी-जास्त फी घेण्यात येते. परंतु, प्रत्येक डॉक्टरला आपला रुग्ण बरा व्हावा, असेच वाटत असते. कोणत्याही डॉक्टरला आपला रुग्ण मरावा, असे वाटत नाही. कारण, मग त्या हॉस्पिटलमध्ये कुणीही जाणार नाही.’ ’डॉक्टरांना फी घ्यायची आहे, इलाज करायचा आहे आणि हॉस्पिटल देखील चालवायचे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी संतुलन साधावे आणि सामान्य, असहाय नागरिकांचा स्वस्तात इलाज करण्यासाठी आयुष्मान भारत, जनऔषधी आदी उपक्रमांचा लाभ नागरिकांना होईल, यादृष्टीने प्रयत्न करावा,’ असे आवाहन राज्यपाल डॉ. कोश्यारी यांनी केले.

पुढे चला, पुढारी बना

पुण्यात दै. ’पुढारी’च्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. आपण जसे म्हणतो ’पुढे चला’ तसेच ’पुढे चला, पुढारी बना’ असे म्हणायला हरकत नाही. डॉक्टरांनी पुढील आयुष्यात यशस्वी व्हावे आणि पुढील काळात देखील त्यांचा सन्मान व्हावा, अशी प्रार्थना करतो, असेही कोश्यारी यावेळी बोलताना म्हणाले.

आयुष्यातील अविस्मरणीय दिवस : डॉ. संचेती

डॉ. संचेती म्हणाले, ’माझ्या आयुष्यातील आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कोल्हापूर-सांगलीच्या डॉक्टरांचे पुण्यात स्वागत होत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. दै. ’पुढारी’ जनतेच्या मनातील म्हणणे सतत मांडण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. ही आनंदाची बाब आहे. माझा मुलगा डॉ. पराग संचेती हा आता माझा कार्यभार जसा संभाळत आहे. तसाच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा कार्यभार त्यांचा मुलगा डॉ. योगेश जाधव समर्थपणे सांभाळत आहे. त्यांच्या कार्यकाळात दै. ’पुढारी’चा खपही वाढतोय. यातच त्यांचे यश दडले आहे. कोल्हापूर, सांगली भागात मी पोलिओचे अनेक कॅम्प घेतले. अनेक शस्त्रक्रिया केल्या. या उपक्रमांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील डॉक्टरांनी मला खूप सहकार्य केले.’

स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या चळवळीत ’पुढारी’ अग्रेसर : डॉ. योगेश जाधव

या वेळी दै. ’पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव प्रास्ताविकात म्हणाले, ’पुढारी’च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉ. के. एच. संचेती यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील डॉक्टरांचा सन्मान राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी बहुमूल्य वेळ दिला. स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सामाजिक चळवळीत ’पुढारी’चे मोठे योगदान आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या सियाचीन भागात ’पुढारी’ समूहाने रुग्णालय उभारले. यामध्ये आजपर्यंत पाच लाख जवानांनी उपचार घेतले. दरवर्षी या रुग्णालयाला काही ना काही आर्थिक मदत ’पुढारी’च्या माध्यमातून दिली जाते. जागतिक दर्जाचे ब्लँकेट आपण त्यांना दिले. यंदा २५ लाख रुपये देऊन ब्लड बँक उभारण्यात आली आहे. तसेच, गुजरातमध्ये भूकंप झालेल्या भूज येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. कोरोना काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून ’पुढारी’ने काम केले. दिव्यांगांसाठी राज्यात सर्वव्यापी लसीकरण मोहीम हाती घेतली. कोल्हापूरसह पुण्यासाठी कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार आहे. दै. ’पुढारी’ची वैद्यकीय क्षेत्रासोबतची ही बांधिलकी अशीच सुरू राहील, असे आश्वासन डॉ. योगेश जाधव यांनी दिले.

या डॉक्टरांचा झाला सन्मान…

या वेळी कोल्हापूर, सांगली व मिरज येथील डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात डॉ. गीता पिल्लई, डॉ. विलास नाईक, डॉ. अक्षय शिवछंद, डॉ. विजय माळी, स्नेहल माळी, डॉ. वसीम काझी, डॉ. किरण वसंत पाटील, डॉ. अशोक चौगुले, डॉ. बिपीन गोंजारी, डॉ. प्रसाद माने, डॉ. सयाजी गुणके, डॉ. प्राची गुणके, डॉ. दीपक पाटील, एस. एन. बाबा जांभळे, डॉ. सचिन कुलकर्णी, निरंजनदास सांगवडेकर, डॉ. संदीप मोहिते, डॉ. पांडुरंग खटावकर, पोपटलाल शहा, डॉ. कपिल पाटील, डॉ. नाथानीयनल ससे, डॉ. सुजय कुलकर्णी, डॉ. सुनील साळुंखे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. अनिल मडके, डॉ. प्रियंका गायकवाड, डॉ. बी. के. प्राणी, डॉ. बी. एस. भोसले, डॉ. दिलीप माने, डॉ. उत्तम कुंभार, डॉ. उमेश दत्ता कळेकर, डॉ. अनिल अमृत पाटील, डॉ. एन. डी. मुरकुटे, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. प्रदीप पाटील यांचा समावेश होता.

दैनिक पुढारी आयोजित हेल्थ आयकॉन अवॉर्ड 2022

Back to top button