CNG price : सणासुदीच्या काळात महागाईची झळ सर्वसामान्यांना ! सीएनजीच्या दरात ४ रूपयांनी वाढ | पुढारी

CNG price : सणासुदीच्या काळात महागाईची झळ सर्वसामान्यांना ! सीएनजीच्या दरात ४ रूपयांनी वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एमएनजीएल प्रशासनाने सीएनजीच्या दरात (CNG price) आता पुन्हा 4 रूपयांनी वाढ केली आहे. सीएनजीचा दर आता 87 रूपयांवरून थेट 91 रूपये झाला आहे. तब्बल 4 रूपयांनी वाढ झाल्यामुळे रिक्षाचालक नाराज झाले आहेत. ही दरवाढ रविवार आणि सोमवार दरम्यानच्या मध्यरात्रीपासून (दि.3) पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण भागात लागू होईल. दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजेच एमएनजीएल मार्फत पुरवठा होणारा सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात एमएनजीएलने 6 जुलै 2022 च्या मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागात 3 रूपयांनी दरवाढ लागू केली होती. तेव्हा सीएनजी 82 रूपये प्रति किलो मिळत होता. वाढ झाल्यावर तो 85 रूपयांनी मिळू लागला. त्यानंतर एमएनजीएल प्रशासनाने मागील महिन्यात तो 6 रूपयांनी वाढविला. त्यामुळे तो 91 रूपये झाला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यातील 4 रूपये पुन्हा कमी केले. त्यामुळे सीएनजीचा दर 87 रूपये झाला होता. अन आता पुन्हा महिन्याभरातच एमएनजीएल प्रशासनाने यामध्ये डोमेस्टिक नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या किमतीत 4 रूपयांनी वाढ केली. त्यामुळे आता सीएनजी 91 रूपयांना मिळणार आहे.

सीएनजी गॅसवर सर्वाधिक रिक्षाचालक आणि पीएमपीच्या बस अवलंबून आहेत. सीएनजी वाढल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये आणि पीएमपी प्रशासनामध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशी दर वाढ सातत्याने होत राहिल्यास पीएमपी आणि रिक्षाचालक पुन्हा भाडे वाढ करण्याच्या तयारीत आहेत. याचा फटका सामान्य माणसाला बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button