खेड: कडधे (ता. खेड) गावात शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर झालेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लॅन्ट प्रत्यक्षात केलेला नसताना त्यासाठीचे 2 लाख 69 हजार 381 रुपये ठेकेदाराला देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदाधिकार्यांनी ही रक्कम परस्पर लाटल्याचा आरोप विकास सोसायटीचे संचालक रामदास नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी मिरजे यांसह ग्रामस्थानी केला आहे.
आर ओ प्लॅन्ट जिथे उभारण्यात येणार होता, त्या कडधे गावातील कुलदैवत खंडोबा मंदिर आवारातील त्या जागेचा व आरओ प्लॅन्टचा पंचनामा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंता सुप्रिया शृंगारे यांनी केला.
कडधे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खंडोबा परिसरातील वस्ती आणि येथे नियमितपणे येणार्या भाविकांसाठी एटीएमद्वारे शुद्ध पाणी देण्यात येणार होते, त्यासाठी ही तरतूद केली होती. काम न करता 7 एप्रिल 2022 रोजी त्याची मंजूर रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली. पैसे दिले मात्र आरओ प्लॅन्ट बसवला नसल्याचे माजी उपसरपंच संदीप मिरजे व काही ग्रामस्थांच्या लक्षात आले.
एका सदस्यानेच बाहेरील ठेकेदाराच्या नावाने हे काम केले असे गावात बोलले जात आहे. काम न करता धनादेशाद्वारे ठेकेदाराला पैसे कसे दिले? याची विचारणा पाणीपुरवठा विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली. याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बिल अदा करताना मूल्यांकन दाखला कसा दिला? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
जिथे आरो प्लॅन्ट आहे असे ग्रामपंचायतीने दाखवले आहे, तेथे सद्य:स्थितीत वीजजोड नाही, एटीएम मशीन नाही, पाण्याच्या टाक्या नाहीत, फिल्टर यंत्रही नाही, याशिवाय फाउंडेशन अथवा प्लंबिगही नाही, असे संदीप मिरजे यांनी म्हटले आहे. त्यांच्या व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2022 मधील ग्रामसभेत या आर ओ प्लॅन्टविषयी काही नागरिकांकडून विचारणा करण्यात आली होती. त्या वेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
माजी उपसरपंच केतन चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, आर ओ प्लॅन्ट बसवला होता; मात्र उंदरांनी नासधूस केल्याने तो काही दिवस बंद होता. त्यानंतर तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. कोणत्या तारखेला यातील काय घडले? याबाबत मात्र काही सांगता येणार नाही असे चव्हाण म्हणाले.
याबाबत कडधे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रामदास नाईकडे यांनी सांगितले की,आपण घरगुती फ्रिज घेतला तरी त्यासाठी स्टँड घेतो. येथे ग्रामपंचायतीने जवळपास पावणेतीन लाख रुपये खर्च करून कोणतीही तरतूद केलेली दिसून येत नाही. या संपूर्ण बाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. सरपंच प्रियांका देवदरे यांनी प्रतिसाद दिला नाही.
सन 2022 मध्ये प्लॅन्ट बसवला होता. त्याला वीजपुरवठा केला नव्हता, त्यामुळे हा प्लॅन्ट सुरू झाला नव्हता. सहा महिने झाल्यानंतर बिघाड झाल्याचे सांगून दुरुस्तीसाठी देण्यात आला. तो अद्याप बसवलेला नाही. मात्र चौकशी सुरू झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत प्लॅन्ट बसवला जाईल, असे ठेकेदाराने तातडीने कळवले आहे.
- सचिन नाईकडे, उपसरपंच, कडधे