

आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा जवळ एस. टी. बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील तिघे जण जागीच ठार झाल्याचे समजत आहे. या अपघातात रमेश किसन मेमाणे ( वय 60),संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40) व पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) हे तिघे जण बोरमाळ वस्ती ,पारगाव मेमाणे ,ता पुरंदर जि पुणे येथील रहिवाशी आहेत.
या बाबत माहिती अशी की सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघे जण रस्ता क्रॉस करून जात असताना एस टी बस व या दुचाकीचा अपघात झाला. ही घटना दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
एस टी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी गाडी बस खाली गेल्याने दुचाकीला फरफट नेले. या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जागीच ठार झाले. तिघांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.