

पुणे: शहरातील रस्ते, मैलापाणी प्रकल्प, उड्डाणपूल, खेळाची मैदाने, उद्याने असे महत्त्वाचे 29 प्रकल्प भूसंपादनात अडकले आहेत. महापालिकेला या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 2 हजार 171 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
शहराच्या विकास आराखड्यात अनेक प्रकल्पांची तरतूद करण्यात येते. हे प्रकल्प राबविण्यासाठी खासगी जमिनींचे भूसंपादन करावे लागते. महापालिकेकडून भूसंपादनासाठी जमीन मालकांना भूसंपादनापोटी रोख रकमेऐवजी हस्तांतरणीय विकास हक्कांचा (टीडीआर) वापर केला जातो.
जमीन मालकांकडून या टीडीआरचा वापर करून त्यांच्या इतर प्रकल्पांसाठी किंवा त्याची विक्री करून त्यांना पैसा मिळतो. गेल्या काही वर्षांपासून टीडीआरऐवजी रोख रकमेची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत.
जमीन मालक टीडीआर घेत नसल्याने प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेता पर्चेस नोटीस देत जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जमीन मालकांना रोख रक्कम अदा करण्याची अपरिहार्यता महापालिकेपुढे निर्माण होते.
चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता आदी ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून अनेक जमीन मालकांना रोख रक्कम अदा करत जमिनीचा ताबा घेतला असून त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक सहकार्य केले आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवीन भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे 65 भूसंपादन प्रकरणांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत निवाडा मंजुरीवर असलेले, निवाडा मंजूर झालेले तसेच नुकसानभरपाई न देण्यात आल्याने निवाडा जाहीर होणे बाकी असलेल्या 29 प्रकरणांसाठी डिसेंबरअखेरीपर्यंत 2 हजार 171 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. महापालिकेच्या भूसंपादन व व्यवस्थापन विभागाने तशी माहिती महापालिका आयुक्तांना सादर केली आहे.
महापालिकेकडून सध्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. कात्रज चौकातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. तसेच, गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून संचेती रुग्णालयापर्यंत 45 मीटर डीपी रस्त्याचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित जमीन मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहरातील महत्त्वाचे प्रस्ताव
सिमला ऑफिस चौक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार
चाफेकर पुतळा चौक ते संचेती रुग्णालय. (45 मीटर डीपी रस्ता)
कात्रज-कोंढवा रस्ता (50 मीटर रस्ता)
कात्रज सर्व्हे क्रमांक 1/2 (ब) कात्रज चौक
बालेवाडी सर्व्हे क्रमांक 17, खेळाचे मैदान
बाणेर येथे मैलापाणी प्रकल्प (जायका)
पर्वती तळजाई- वनउद्यान
वारजे- शिवणे नदीकाठचा रस्ता
गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर
वारजे जुना जकात नाका ते गणपती माथा
धनकवडी ओटा मार्केट व पोलिस चौकी