पुणे: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलतर्फे सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत 271 परदेशी किंवा अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध 17 महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. यातील 68 विद्यार्थ्यांची पसंती पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा सोपी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिल्याने परदेशी विद्यार्थ्यांमध्ये राज्यात प्रवेश घेण्यात अधिक रस असल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांना पसंती दिली असून त्या सोबतच व्यवस्थापन आणि विधी अभ्यासक्रमांसाठीही परदेशातून विद्यार्थी इच्छुक आहेत. (Latest Pune News)
यंदा 52 देशांमधून तब्बल 430 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. त्याशिवाय मूळ भारतीय असलेल्या परंतु आता अनिवासी भारतीय असलेल्या 682 विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच 74 विद्यार्थी नेपाळचे, त्याखालोखाल 72 विद्यार्थी संयुक्त अरब अमिरातीचे आहेत. त्याशिवाय इंडोनेशिया, कतार,
सौदी अरेबिया, ओमान या देशांमधील विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
विशेष म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फान्स, अर्जेंटिना, युके या देशांमध्येही विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 271 विद्यार्थ्यांनी 17 विविध संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी आपला प्रवेश निश्चित केला. यात सर्वाधिक म्हणजे 143 विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स, एआय, माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
त्यातही पुण्यातील सीओईपी या संस्थेत 68 विद्यार्थ्यांनी विविध शाखांना प्रवेश झाले आहेत. तसेच 12 विद्यार्थ्यांनी विधी महाविद्यालयांमध्ये विधी-तीन किंवा विधी-पाच वर्षे अभ्यासक्रमांची निवड केली आहे. डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (पीयूएमबीए) येथे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ एवढी आहे.
राज्यभरातील पुण्याचे सीओईपी, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयएलएस लॉ कॉलेज, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत या संस्थांचा समावेश आहे. त्याशिवाय सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तसेच माटुंगा येथील व्हीजेटीआय, आदी संस्थांनाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे आले होते अर्ज
नेपाळ- 74
संयुक्त अरब अमिराती- 72
इंडोनेशिया- 61
कतार- 37
सौदी अरेबिया- 34
ओमान- 26
कुवेत- 19
अमेरिका- 10