आशिष देशमुख
पुढारी प्रतिनिधी पुणे : मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत संपूर्ण देशाचा विचार केला, तर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. चार महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
फक्त हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा ताळेबंद तयार केला असता, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात खूप चांगला पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र हे विभाग काठावर पास झाले होते.
सरासरीत ५ ते ८ टक्के जास्त पाऊस झाला होता. मराठवाडा १६, तर विदर्भात १२ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदा मात्र संपूर्ण राज्यात चार महिन्यांत सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात ३६ पैकी २० जिल्ह्यांत मुसळधार, १५ जिल्ह्यांत साधारण पाऊस झाला आहे.
राज्यात १ जून ते २६ सप्टेंबर या कालावधीत मान्सून कसा बरसला, हे दाखविणारा हा नकाशा. आकाशी रंगात मुसळधार, हिरव्या रंगात साधारण पावसाचे जिल्हे दाखवले आहेत. तर लाल रंग म्हणजे कमी पावसाचा हिंगोली हा एकमेव जिल्हा दाखवला आहे.
राज्यातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेत यंदा मध्य महाराष्ट्र चार महिन्यांच्या सरासरीत ३७ टक्के इतकी असून, सर्वात जास्त पावसाचा प्रदेश ठरला आहे. यात सांगली (५६ टक्के), नगर (५१ टक्के), कोल्हापूर (४६ टक्के), पुणे (४३ टक्के) इतका पाऊस झाला आहे.
(१ जून ते २६ सप्टेंबर) राज्याची सरासरी: ९७०.९, प्रत्यक्ष पडला : १२०३ मिमी (२४ टक्के अधिक) • अतिवृष्टी : सरासरी ६० टक्के : एकही जिल्हा नाही मुसळधार : २५ ते ५९ टक्के : २० जिल्हे साधारण: (उणे ५ ते २४ टक्के): १५ जिल्हे कमी पाऊस : (उणे ३६ टक्के) : हिंगोली जिल्हा खूप कमी पाऊस (उणे ५० टक्के) एकही जिल्हा नाही
• कोकण : सरासरी: २८२२.३, पडला : ३५६९.४ (२६ टक्के अधिक) • मध्य महाराष्ट्रः सरासरी : ७१९.९, पडला : ९८६.९ (३७ टक्के अधिक) • मराठवाडा : सरासरी: ६२३.१, पडला : ७४६.९ (२० टक्के अधिक)
राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वच विभागांत सरासरीपेक्षा खूप चांगला पाऊस झाला. फक्त हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पावसाचे प्रमाण आहे. ऑगस्ट अखेर हे प्रमाण उणे ७८ टक्के होते. मात्र, १ व २ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जो पाऊस झाला, त्याने ही मोठी तूट भरून काढली. अजून सप्टेंबरचे तीन दिवस बाकी आहेत. -
डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे