खडकवासला: रविवार (दि. 9) सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर भल्यामोठ्या आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी तुफान हल्ला चढविला. त्यात वीसहून अधिक पर्यटक जखमी झाले.
सैरावैरा पळणाऱ्या पर्यटकांवर हल्ला करून चावा घेणार्या मधमाश्यांचा धोका पाहून वन विभागाने गडावर जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध केला. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी समाधान पाटील व सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानतेने मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या परिसरात घडला.
कल्याण दरवाजात पर्यटकांनी गर्दी केली होती. काही पर्यटक दरवाजाच्या बुरुजावर उभे राहून फोटो काढत होते, तर काही पर्यटक माघारी निघाले होते. त्याच वेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखालील कड्यावर असलेल्या भल्यामोठ्या आग्या मोहोळाच्या मधमाश्या उठल्या.
मधमाश्या दरवाजातील तसेच बुरुजावरील पर्यटकांवर तुटून पडल्या. मधमाश्यांनी अचानक तुफान हल्ला करत समोर येईल त्या पर्यटकाचा चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला, युवकांसह ज्येष्ठ नागरिक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटले.
पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून गडावरील पुरातत्व खात्याचे सुरक्षा रक्षक स्वप्निल सांबरे, घेरासिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर, पवन जोरकर, ओंकार पढेर, हर्षद गायकवाड, नितीन पढेर, हेमंत गोळे, शंकर सांबरे, लहू पवार, मंगेश गोफणे यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी कल्याण दरवाजाकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजाच्या मार्गावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढले.
काही पर्यटक जीव वाचविण्यासाठी झुडपात बसले होते, त्यांनाही अलगद बाहेर काढले. सर्व पर्यटकांना बाहेर काढून कल्याण दरवाजाच्या परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले पर्यटक वाहनतळावर आले, तेथून त्यांना उपचारांसाठी पाठविण्यात आले.
कल्याण दरवाजात पर्यटकांवर मधमाश्यांनी तुफान हल्ला चढविल्याची माहिती मिळताच सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी सुरक्षा रक्षकांसह पुणे दरवाजाकडे धाव घेतली.
सुरक्षा रक्षक नितीन गोळे म्हणाले, कल्याण दरवाजासह गडाच्या तटबंदी बुरुजाखालील कड्यावर आग्या मोहोळाची मोठमोठी पोळी आहेत. त्यामुळे या परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई आहे. असे असताना काही हौशी पर्यटक आग्या मोहोळाच्या पोळ्यांजवळ जातात.
कपड्यांवरील सुगंधी द्रव्यामुळे तसेच काही पर्यटक दगड मारत असल्याने मधमाश्यांचे पोळ उठून सैरावैरा हल्ला करतात. आज सिंहगडावर वीस हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. सकाळी दहा वाजेपर्यंत गडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मात्र कडक उन्हामुळे दुपारपर्यंत पर्यटकांची संख्या रोडावली. चार वाजल्यापासून पुन्हा गर्दी झाली.
सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले, सिंहगडावरील वाहनतळावर वाहनांचे नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने उभी करण्यात आली तसेच त्यामुळे घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.
गडांसह धरण परिसरात गर्दी
सकाळी नऊच्या सुमारास तासभर घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नंतर मात्र घाट रस्त्यावरील वाहतूक दिवसभर सुरळीतपणे सुरू होती. सिंहगडावर आज दिवसभरात पर्यटकांच्या दुचाकी 1021 व चारचाकी 408 अशी वाहने गडावर गेली. वाहनचालकांकडून 91 हजार 850 रुपयांचा टोल वन विभागाने वसूल केला. राजगड किल्ल्यावर आज दिवसभरात दोन हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. खडकवासला धरण चौपाटीसह पानशेत वरसगाव धरण परिसरात पर्यटकांनी सुटी साजरी करण्यासाठी गर्दी केली होती.