नसरापूर: महाराष्ट्र दिनाच्या सुटीला आलेले चाकरमानी पुणे, मुंबईकडे एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून परत जात असताना पुणे -सातारा महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला बसने जोरात धडक दिली. या अपघातात बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले.
यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. तर अपघातात दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला असून, जखमी प्रवाशांवर नसरापूर येथील सिध्दिविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर परिसरातील आहेत. पुणे - सातारा महामार्गावर कामथडी (ता. भोर) येथे उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि.2) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. (Latest Pune News)
याबाबत प्राजक्ता सतीश धनवे यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बसचालक दत्तात्रय कचरे (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्राजक्ता धनवे (वय 30), आदित्य सणस (वय 33), मेघा सणस (वय 28), पायल सणस (वय 18), प्रियंका सणस (वय 20), विश्वास सणस (वय 35), आदिती सणस (वय 21), सोनाली सणस (वय 25), राहुल सणस (वय 18 ) अमोल घाडगे (वय 36), स्वाती घाडगे (वय 33 ), जगन्नाथ गायकवाड, नारायण कोंढाळकर, सहदेव कोंढाळकर (वय 47), सविता कोंढाळकर (वय 43 ), कृष्णा अमराळे (वय 48) सुषमा घोलप (वय 35), रूपेश कांबळे (दोघेही रा. वाई), चालक - दत्तात्रय कचरे (वय 40, रा. तळवडे, ता. कोरेगाव ) अशी जखमींची नावे आहेत.
सुटीसाठी आलेले सर्व चाकरमानी कामावर परत जाण्यासाठी वाई येथून ट्रॅव्हल्स बसने पुणे, मुंबईकडे जात होते. टायर फुटल्याने आयशर टेम्पो बंद अवस्थेत महामार्गावर कामथडी (ता. भोर) हद्दीत उभा होता. त्याचे इंडिकेटर चालू होते. या वेळी समोरील वाहनाने अचानक कट मारल्याने टेम्पो दिसून न आल्याने पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्स बसची टेम्पोला जोरदार धडक बसली.
त्यात बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. राजगड पोलिस आणि स्थानिक तरुणांनी जखमींना बसमधून उतरवून रुग्णवाहिकेमधून नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अजित माने करीत आहे.
गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
अपघातात डोक्यास आणि हाडे फ्रॅक्चर झाल्याने प्राजक्ता धनवे, मेघा सणस, आदित्य सणस, सोनाली सणस, स्वाती घाडगे, दत्तात्रय कचरे, कृष्णा अमराळे या गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी सांगितले.