

पुणे: पुणे शहरात गतवर्षी खुनाच्या 93 घटना घडल्या आहेत, तर चालू वर्षात 31 मार्चअखेर 19 खून झाले आहेत. प्रेम, अनैतिक संबंध, चारित्र्याचा संशय अशा विविध कारणांतून हे खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पूर्ववैमनस्य, किरकोळ व घरगुती कारणांतून झालेल्या खुनांचेदेखील मोठे प्रमाण आहे.
मागील पंधरा महिन्यांत शहरात 112 जणांचे खून झाले आहेत, तर 240 जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. खून आणि खुनाचा प्रयत्न करणार्यांमध्ये 282 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. दिवसेंदिवस शहराचा आकार वाढत आहे. जसा आकार वाढत आहे, तशी लोकसंख्या देखील वाढत आहे. नोकरीच्या शोधात शहरात येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यातूनच गुन्हेगारी देखील वाढीस लागत आहे.
पूर्ववैमनस्य असलेल्या टोळक्यांकडून आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य केली जातात. त्यातूनच दोन टोळ्यांच्या संघर्षात नजरेला नजर भिडताच बंदुकीचा बार अन् कोयत्याचा वार काढला जात आहे.
कधी प्रियकराकडून, तर कधी प्रेयसीकडून गेम
प्रेमसंबंधातून घडलेल्या खुनांचे प्रमाण मोठे आहे. एकेकाळी एकमेकांसोबत एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेणाऱ्याकडून एकमेकांचा काटा काढला जात आहे. कधी प्रियकराकडून प्रेयसीचा गेम केला जातोय, तर कधी प्रेयसीच आपल्या प्रियकराचा गेम करत आहे. असे पाच जणांचे खून झाले आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातून तीन खून झाले आहेत.
किरकोळ कारण उठतेय जिवावर
किरकोळ कारणातून झालेल्या खुनांच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तब्बल 45 जणांचे खून या कारणातून झाले आहेत. क्षणिक रागाचे कारण अशा खुनाच्या घटनांना प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, घरगुती आणि कौटुंबिक वाद देखील अनेकांच्या मुळावर उठला आहे, तर इतर कारणांतून 32 जणांचे खून झाले आहेत.
खुनामागे नेमकी कोणती कारणे
अनैतिक संबंधाचा संशय : 03
पूर्ववैमनस्य : 05
प्रेमसंबंध : 06
किरकोळ कारण : 45
चारित्र्याचा संशय : 10
इतर कारणे : 32