

पुणे: जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक यासारखी 184 पदे गेल्या काही काळापासून रिक्त आहेत.जिल्ह्यातील महसूल प्रशासनात एकूण 1 हजार 881 पदे मंजूर आहेत.
त्यामध्ये मंडल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी (अव्वल कारकून) महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वाहनचालक तसेच ड वर्गातील शिपाई अशी विविध पदे जिल्हा प्रशासनासह महसूल विभागात कार्यरत आहेत.
या कर्मचार्यांवर नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून येणार्या विविध प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे काम मंडळ अधिकार्यांसह अव्वल कारकून करतात. मात्र, स्थानिक पातळीवर त्या प्रकरणाचा अहवाल देणे, पंचनामे करणे यांसारखी छोटी वाटणारी पण महत्त्वाची कामे करण्यासाठी तलाठी आवश्यक असतो.
पुणे जिल्ह्यात 1 हजार 881 पैकी सद्य:स्थितीत 1 हजार 697 पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी सध्या 184 पदे ही रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कामे करणारी सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यासह शिपाई वर्गातील कर्मचार्यांवर मोठी जबाबदारी असते. त्यांचीच पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचार्यांची रिक्त पदांचा सरकारकडून आढावा घेतला जातो. त्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यामुळे सरकार कधी भरती करेल हे आताच सांगता येणार नाही’, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.