बारामती : पुढारी वृत्तसेवा : काटेवाडी (ता. बारामती) येथे 'एक तास राष्ट्रवादी पक्षा'साठी या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात आज (दि. ७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच एका शेतकऱ्याने प्रांताधिकारी यांची तक्रार करून खळबळ उडवून दिली. दादा, प्रांताधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाहीत. मुद्दाम अडथळे आणले. आमच्याकडे ५ लाख रुपये मागितले, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभा काही वेळ स्तब्ध झाली.
अचानक झालेल्या या आरोपांमुळे सभेचा नूरच पालटला. दरम्यान, संबंधित क्षेत्रातील वाटपच अद्याप झालेले नाही. भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ याठिकाणी अजित पवार यांच्याकडे केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील कार्यक्रम आटोपून ते काटेवाडीत 'एक तास पक्षा'साठी या उपक्रमासाठी पोहोचले. यावेळी त्यांचे भाषण सुरु असतानाच श्रोत्यांमध्ये बसलेल्या काटेवाडीतील अजित देवकाते या शेतकऱ्याने उभे राहून अचानक ही तक्रार केली. त्यानंतर लगेच प्रांताधिकारी यांनी पुढे येऊन पवार यांच्याकडे खुलासा केला.
त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. 'अजित, तुझे आणि माझे नाव एकच आहे. तरी मी एवढा संयमीपणे बोलतो आहे. तू देखील शांतपणे बोल, तुझे जे काही काम असेल, ते मार्गी लावतो', असे म्हणत पवार यांनी देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचलंत का ?