

जुन्नर: छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मधमाश्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 17 पर्यटक जखमी झाले. यामध्ये 5 लहान बालकांचा समावेश आहे. जखमींमधील काही पर्यटक कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील आहेत. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी 9 च्या सुमारास घडली.
रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेक शिवभक्त तसेच पर्यटक शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गडावर उपस्थित होते. गडाचे प्रथम प्रवेशद्वार तसेच शिवाईदेवी मंदिराजवळ मोहोळाच्या माश्या उठल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थितांची धावपळ झाली. ही घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
मधमाश्यांच्या चाव्याने जखमी झालेल्या 17 जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यामध्ये 5 लहान बालकांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचारांनंतर सुटी देण्यात आली, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकाटे यांनी दिली.
वन विभागाचे कर्मचारी तसेच शिवजन्मभूमी अॅम्बुलन्स सर्व्हिसेस व शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, आतिफ सय्यद, महिंद्र नवले आदींनी सर्व पर्यटकांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात मदत केली.