भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर प्रशासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाने 15 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. या मध्यवर्ती कार्यालयामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. भोर शहरातील नवी आळी येथे शुक्रवारी (दि. 23) नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, बाजार समितीचे सभापती आनंदराव आंबवले, माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब थोपटे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी गटनेते सचिन हर्नासकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळेकर, नगर अभियंता अभिजित सोनावले, वास्तुविशारद पवन भागणे, सार्वजनिक विभागाचे सहायक शाखा अभियंता योगेश मेटेकर, प्रकाश जाधवर, माजी नगरसेवक जगदीश किरवे.
अमित सागळे, सुमंत शेटे, बजरंग शिंदे, शांताराम पवार, संतोष केळकर, राजेंद्र शेटे, अक्षय वाघमारे, तौसिफ आत्तार, परवेश शेख आदी या वेळी उपस्थित होते. भोर शहरातील अनेक शासकीय कार्यालये मोडकळीस आली आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्या नगरपालिकेची आरक्षित जागा राज्यशासनाकडे हस्तांतर करून त्या जागेवर भव्य प्रशासकीय कार्यालय उभारण्यात येत आहे. या नूतन इमारतीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय, दुय्यक निबंधक, वजन-मापे कार्यालय, कृषी, सार्वजनिक बांधकाम, सहकार, विद्युत विभाग, सामाजिक वनीकरण यांसह अनेक शासकीय कार्यालये असणार आहेत.
त्यामुळे नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, तर प्रशस्त वाहनतळही उपलब्ध होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. प्रशासकीय इमारतीसाठी एकूण जागा ही 8 हजार 90 चौरस मीटर उपलब्ध आहे. त्यामध्ये तळमजला 1 हजार 233 चौरस मीटर, पहिला मजला 1 हजार 601.10 चौरस मीटर, दुसर्या टप्प्यात दुसरा मजला 1 हजार 628.10 चौरस मीटर, तिसरा मजला 1 हजार 543.67 चौरस मीटर असे एकूण 6 हजार 6.54 चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी शासनाकडून 15 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम एका वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे, अशी माहिती शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी दिली.
हेही वाचा