पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पतीला दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडर घातला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडला.
मीना नितीन वकटे (35, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती नितीन आयलाजी वकटे (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फिर्यादी मीना घरी असताना आरोपी पती नितीन याने तिच्याकडे दारूसाठी पाचशे रुपये मागितले.
मात्र, तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून पतीला पर्सही दाखविली. मात्र, पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत याचा राग आरोपी नितीन याला आला.
संतापलेल्या आरोपी नितीन याने त्याची पत्नी मीना यांच्या डोक्यात तीनवेळा गॅस सिलेंडर घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मीना यांच्या नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. बुधवारी रात्री मीना यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या गुन्ह्यात कलमवाढ केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.