पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अजब कारभार!! सारथी ॲप केले बंद, घरपट्टी भरण्यासाठी गर्दी | पुढारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अजब कारभार!! सारथी ॲप केले बंद, घरपट्टी भरण्यासाठी गर्दी

वाकड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सारथी ॲप बंद असल्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या भरणा केंद्रावर गर्दी केली. गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या सारथी ॲपवर प्रॅापर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स ऑनलाइन भरता येत नव्हते. मार्च महिना असल्यामुळे नागरिकांनी प्रोपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स भरण्यासाठी गर्दी केली होती.

नागरिकांचा भरणा केंद्रावर अनेक अडचणींशी सामना

वाकड भागात आयटीएनसी संख्या जास्त असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात भरणा हा ऑनलाइन पद्धतीने भरला जात होता. परंतु मागील आठवड्यापासून ऑनलाईन सुविधा बंद अवस्थेत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज मार्च महिन्याचा अखेरचा दिवस असून जर ही कामे पूर्ण केली नाही, तर उद्यापासून त्यावर दंड आकारला जातो.

थेरगाव परिसरातील घरपट्टी भरणा केंद्रांमध्ये घरपट्टी भरण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिले असता अतिशय घाणेरडा वास नागरिकांना सहन करावा लागत होता. इथे असणाऱ्या झाडावरती पक्षांनी केलेल्या घाणीमुळे नाकाला रूमाल बांधून नागरिकांना रांगेमध्ये उभे राहावे लागत होते.

महापालिकेच्या भरणा केंद्रावरती फक्त कॅश किंवा चेक स्वीकारले जात होते परंतु नागरिकांना याची कल्पना नसल्यामुळे ज्यांचे कार्ड पेमेंट होते त्या नागरिकांना नंबर आल्यावर नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची कुठलीही कल्पना नागरिकांना दिली जात नव्हती. तरी महापालिकेने याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत होते.

”मागील आठवड्यात मी भरणा केंद्रावर लाईन मध्ये उभा राहिलो होतो आणि माझा नंबर आल्यावर मला ज्यावेळी कार्ड पेमेंट बद्दल विचारले तेव्हा कार्ड पेमेंट सुविधा बंद असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे मला परत माघारी जावे लागले.”                                                 -एक नागरिक- डॉक्टर तळणीकर

हेही वाचा 

Back to top button