

पुणे: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 मतदारसंघांसाठी एकूण 145 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चाच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत खर्च 18 कोटी रुपयांनी अधिक झाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत 88 लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानासाठी जिल्ह्यात 8 हजारांहून अधिक मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, बैठकव्यवस्था, प्रतीक्षालय, मंडप, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या. या सोयीमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत 132 कोटींचा खर्च
गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी मतदारयादी छपाई, मतदानयंत्रांची वाहतूक, कर्मचार्यांचे मानधन, यासाठी 132 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. या निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने निधी पाठविण्यात आला होता.
आता विधानसभा मतदारसंघासाठी 145 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मतदारयाद्या छपाई, प्रसिद्ध करणे, मतदानयंत्राची वाहतूक, गोदामातून ने-आण, सुरक्षा, स्टेशनरी, कर्मचार्यांसाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी चहा, नाष्टा, जेवणाची सुविधा, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, कुलर, टीव्ही स्क्रीन, मतपेट्या, अधिकार्यांसाठी वाहतुकीसाठी गाड्या, अशा विविध प्रकारच्या सोयीसुविधांसाठी हा खर्च झाला आहे.
यापैकी बहुतांश कामांसाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. यासंदर्भात झालेला खर्च मिळावा, यासाठी राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावानंतर आता पैसे उपलब्ध होतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.