पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून मृतदेह कात्रज बायपासजवळ फेकला | पुढारी

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून मृतदेह कात्रज बायपासजवळ फेकला

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार पुणे येथील मंतरवाडी येथे घडला. यानंतर तिचा मृतदेह साडीत गुंडाळून तो खांद्यावर घेऊन जात कात्रज बायपासजवळ मोकळया जागेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खून करणार्‍या पतीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विद्या राहूल फडतरे (२३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी मयताचा पती राहूल ज्ञानोबा फडतरे (वय-३२ रा. मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक केली आहे. याबाबत मुलीचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय-५०,रा.परिंचे, ता. पुरंदर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

राहूल फडतरे हा वाहन चालक म्हणून काम करत असून त्याचे सात वर्षापूर्वी विद्या सोबत लग्न झाले. त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र, राहुल हा विद्या हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता. याबाबत तिने सासवड पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती.

यात तिच्या सासरच्यांवर कारवाई देखील झाली आहे. हा वाद संपविण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार माहेरी गेलेली विद्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली. सोमवारी (दि. २१) रोजी दुपारी फिर्यादी शेडगे यांना हडपसर पोलिस ठाण्यातून फोन आला. त्यानुसार ते आणि त्यांची पत्नी हडपसर पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांना विद्या हिचा गळा दाबून राहुल फडतरे यांनी खून केल्याचे सांगितले.

पुणे : पत्नीचा खून केल्याची कबुली

कात्रज-बायपास रस्त्यावर मंतरवाडी येथील मोकळ्या जागेत हडपसर पोलीसांना एका साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी तिची ओळख पटवून त्याबाबत राहुल याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

२१ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याचे सुमारास पती-पत्नी घरात असताना, राहुल याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीत गुंडाळून घराजवळील मोकळ्या‌ प्लॉटमध्ये फेकून दिल्याचे सांगितले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे पुढील तपास करत आहे.

Back to top button