पुणे
पिंपरी : काळेवाडी फाट्यावर फर्निचर दुकानाला भीषण आग
पुणे ; पुढारी वृत्तसेवा : काळेवाडी फाटा येथील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पहिल्या मजल्यावर फर्निचर दुकान असून दुसऱ्या मजल्यावरती नागरिक राहत होते घरामध्ये तीनजण अडकल्याची भीती वर्तविण्यात येत होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरातील तीन लोकांना खिडकीतून बाहेर काढण्यात यश आले असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
गॅस सिलेंडरच्या टाक्या स्थानिकांच्या मदतीने त्वरित बाहेर काढण्यात आल्या असून, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. फर्निचरचे दुकान हे मुख्य रस्त्यावर असून, यावेळी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

