पुणे : लवकरच 712 जागांची पोलीस पाटील भरती | पुढारी

पुणे : लवकरच 712 जागांची पोलीस पाटील भरती

पुणे, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे.

गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.

Back to top button