पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे बिनविरोध | पुढारी

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे बिनविरोध

पुणे, पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिका-यांची निवड करीत जिल्ह्यातील भविष्यातील निवडणुकांचा विचार करून यानिमित्ताने समतोल साधल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता झाली. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पदाधिका-यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. दुर्गाडे यांनी बँकेवर अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. बँकेच्या कामकाजाचा असलेला मोठा आवाका आणि पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूनही त्याच्या निवडीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तर चांदेरे यांची निवड करून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, संचालकांच्या पहिल्या बैठकीस बँकेचे संचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे २ आणि भाजपचे २ मिळून एकूण २१ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांना पवार यांना बँकांच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत बँका चालवणे खूप अवघड झाले असल्याचे सांगितले.

हेही वाचा

Back to top button