

शहरात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत एकूण झिकाचे 100 रुग्ण आढळले. त्यापैकी 43 गर्भवती महिलांमध्ये झिकाची लागण झाल्याचे आढळून आले. यापैकी 10 महिलांची आत्तापर्यंत प्रसूती झाली असून, सर्व बाळे निरोगी असून, कोणालाही झिकाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.Zika Update news
झिकाची लागण झालेल्या इतर 33 महिलांचे अॅनॉमली स्कॅन करण्यात आले आहे. स्कॅनमध्ये सर्व गर्भवतींच्या गर्भाची सामान्य वाढ झाल्याचे दिसून आल्याने दिलासा मिळाला आहे. शहरात 20 जून रोजी या वर्षातील पहिला झिका रुग्ण नोंदवला गेला, तर 30 जून रोजी झिकाबाधित पहिल्या गर्भवती महिलेची नोंद झाली. 20 जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत शहरात एकूण 100 झिका रुग्ण आढळून आले. यापैकी 43 गर्भवती महिलांमध्ये झिकाचा संसर्ग आढळून आला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून पुण्यात झिका, चिकुनगुनिया आणि डेंग्यू यांसारख्या कीटकजन्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. यंदा झिकाचे रुग्ण अनपेक्षितपणे वाढले. यामध्ये गर्भवती लक्षणीय प्रमाण दिसले. आम्ही संसर्गजन्य महिलांची नियमित सोनोग्राफी स्कॅन करत आहोत. ज्यांच्यामध्ये झिका संसर्ग आढळून आला त्यापैकी 10 महिलांची प्रसूती झाली असून, सर्वांची बाळे निरोगी आहेत. संसर्गामुळे बाळाच्या वाढीस कोणत्याही प्रकारे अडथळा आलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, स्त्रीला गर्भधारणेदरम्यान विषाणूची लागण झाली असेल, तर गर्भाला संक्रमण होते. गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूचा संसर्ग हे मायक्रोसेफली आणि अर्भकामधील इतर जन्मजात विकृतींचे कारण असू शकते. गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या अंदाजे 5-15 टक्के अर्भकांमध्ये झिका संबंधित गुंतागुंत असल्याचे पुरावे आहेत. गरोदरपणात झिका संसर्गामुळे गर्भाची हानी, मृत जन्म आणि मुदतपूर्व जन्म यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात.