पुणे: महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 25 जलतरण तलाव सुरू असून, उर्वरित दहा जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहेत. ऐन उन्हाळ्याच्या हंगामात हे जलतरण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेच्या मालकीच्या जलतरण तलावांची क्रीडा विभागाने पाहणी केली. या वेळी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना क्रीडा विभागाकडून देण्यात आल्या. दरम्यान, या पाहणीत महापालिकेच्या मालकीच्या 35 जलतरण तलावांपैकी दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद असल्याचे आढळून आले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठेत असलेला न. वि. गाडगीळ जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, तो अद्याप सुरू झाला नाही. शिवाजीनगर येथील आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव, येरवडा येथील केशवराव ढेरे जलतरण तलाव, पाषाण येथील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव, औंध गाव येथील औंध जलतरण तलाव, हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हे दुरुस्तीमुळे बंद आहेत.
यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. घोरपडी येथील नारायण तुकाराम कवडे पाटील जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप करारनामा न झाल्याने तो बंद आहे.