

अनुपमा गुंडे
राज्य सरकार साहित्य संमेलनाला निधी देते, म्हणून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांची भाऊगर्दी, वरचष्मा साहित्यिकांना सहन करावी लागते. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी तापणाऱ्या विषयात साहित्य संमेलनात होणारा राजकीय शिरकाव ही चोथा झालेली चर्चा होते, पण साहित्य संमेलन स्वबळावर व्हावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निधी या निधी उभारण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न होत नाहीत.
त्यामुळे गेल्या 1 तपात स्वबळावर संमेलन निधी या संस्थेकडे 2 कोटी 20 लाख रूपये जमा झाले आहेत. एका संमेलनाचा खर्च आता 2 कोटीच्यावर गेल्याने स्वबळावर संमेलन घेणे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासाठी दिवा स्वप्नंच आहे.
नेमिची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी साहित्य संमेलनाचे वेध लागल्यापासून ते संमेलनाचे सूप वाजेपर्यंत संमेलनाच्या व्यासपीठावर आणि पडद्यामागे राजकीय व्यक्ती आणि संस्थांचा वावर यावर चर्वितचर्वण होते. सरकार संमेलनाला निधी देत असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे हात दगडाखाली असतात, त्यामुळे या राजकीय वावराकडे दुर्लक्ष करतात, किंवा तो वावर खपवून घेतात, हे वास्तव आहे.
मात्र स्वतः महामंडळाने महामंडळाच्या घटनेत तरतूद करून संमेलन स्वबळावर घेण्यासाठी अखिल मराठी साहित्य संमेलन निधी अशी स्वतंत्र विश्वस्त असलेली यंत्रणा तयार केली. महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ या चार मूळ घटक संस्थांचे प्रतिनिधी या निधीचे विश्वस्त आहेत, तर महामंडळाचे अध्यक्ष या निधीचे अध्यक्ष असतात. या निधीव विश्वस्तांद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
मुंबईत अलीकडे झालेल्या संमेलनापासून महामंडळाने संमेलनासाठी निधी उभारण्यासाठी संमेलनाच्या यजमान संस्थेने महामंडळाने या निधीत भर घालावे, असे ठरले होते.. 2012 ते 2015 पर्यंत यजमान संस्थांनी या निधीत प्रत्येकी 3 लाख, 2021 पासून 4 लाख तर आता 5 लाखांची भर पडत आहे.
आतापर्यंत यजमान संस्थांनी निधीसाठी लावलेला हातभार आणि साहित्यप्रेमींनी दिलेला खारीचा वाटा यामुळे या निधीत सुमारे 2 कोटी 20 लाख रूपये जमा झाले आहेत. साहित्य महामंडळाचे कार्यालय दर 3 वर्षांनी वर्ग होत असले तरी या निधीचा कारभार मात्र मुंबईतून सुरू असतो.
साहित्य संमेलनाच्या आयोजकांना निधीची कमतरता भासल्यास या कोषातून निधी देण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेत आहे. तशी काही संमेलनाला या निधीतून गरज भासल्यास मदत करण्यात आली आहे. याशिवाय महामंडळ तसेच महाराष्ट्राबाहेर असलेल्या संलग्न घटक संस्थांना साहित्यविषयक उपक्रमांना या निधीतून हातभार लावला जातो.
संमेलनाच्या साहित्यविषयक निर्मिती आणि साहित्यावरील खर्चासाठीच या निधीचा विनियोग करण्याच्या सूचना घटनेत आहेत, त्यामुळे भव्य, डोळ्याचे पारणं फेडेल असं करण्यासाठी,त्यातील जेवणावळी, मांडव यासाठी या निधीचा वापर करता येणार नाही, पण साधंपणानं संमेलन करण्याऐवढाही निधी आतापर्यंत जमा झालेला नसल्याने स्वबळावर संमेलन घेण्याची मनिषा आतातरी दिवास्वप्नंच आहे.