

खानिवडे : आताच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत १३२ आमदार निवडून येणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी नालासोपाऱ्यातील नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी लोकलमधून प्रवास केला आहे. समान्यांप्रमाणे नालासोपारा ते मुंबई प्रवास करणाऱ्या नाईकांमुळे प्रवासी मात्र अचंबित झालेले पहावयास मिळले.
सकाळच्या सात एकवीसच्या लोकलने ते ज्या डब्ब्यात शिरले त्या डब्ब्यात आमदार आले असल्याचे समजताच अनेकांनी आपली आसने रिकामी केली. आणि भारत माता की जय व वंदे मातरम् चा जय घोष करून परिसर दणाणून सोडला.
मी आता आमदार झालो असलो तरी पूर्वीपासून मी ट्रेननेच प्रवास करत आलो आहे. या प्रवासातील अडचणी मला पुरेपुर माहिती आहेत. मतदार संघात असलेल्या अश्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी व सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्राधान्याने आणि कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तर लोकल प्रवासात कितीही अडचणी असल्या तरी आजच्या घडीला सर्वात सुरक्षित प्रवास हा ट्रेनचाच असल्याचे त्यांनी सांगितले.
- राजन नाईक, आमदार