

तलासरी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गुजरात राज्याला जोडणार्या तलासरी-उंबरगाव मार्गावरील झरीखाडी येथे नवीन पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने पंधरा ते अठरा गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळ्यात दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे.
तलासरी-उंबरगाव मार्गावरील झरी खाडी येथे सहा महिन्यांपूर्वी नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि रहदारी होत असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हे काम पावसाळ्यापूर्वी होऊ शकले नाही.
पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उंबरगाव ते तलासरीकडे जाणार्या प्रमुख जिल्हा मार्गावर हा नवीन पूल बांधला जात असून यासाठी 22 कोटी खर्च केला जाणार आहे. परंतु पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित होते मात्र अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. संथ गतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे तलासरी येथून उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीत जाणारे शेकडो कामगार, विद्यार्थी, रुग्ण, नागरिकसह जड अवजड वाहनाना पर्यायी मार्गाने दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घालून जावं लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुलाचे काम सुरू करताना या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करून पर्यायी रस्त्याने वळवण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. तसेच काम सुरू असलेल्या प्रस्तावित पुलाशेजारी कच्चा रस्ता तयार करून वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र पावसाळ्यात नदीला येणार्या पुरामुळे कच्चा रस्त्यावरून वाहतूक करणे सुरक्षित नसल्याकारणाने कच्च्या रस्त्यावरील पर्यायी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून त्या ऐवजी नागरिकांना व प्रवासांना तसेच जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी कवाडा वसा मच्छीपाडा वेवजी मार्गे उंबरगाव तसेच नारायण ठाना गिरगाव संजान मार्गे उंबरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने अधिसूचना जारी करून करण्यात आले आहे.
झरी खाडी येथे डिसेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या पुलाचे काम काही प्रमाणात पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेऊन वाहतूक सुरळीत सुरू होणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराला मंजूर निधी पैकी दीड ते दोन कोटीच निधी मिळाला आहे. मंजूर निधी मिळत नसल्यानेच पुलाच्या कामांमध्ये दीर्घ कालावधी लागत असल्याने ठेकेदारासमोर देखील मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर पुलाचे काम तातडीने मार्गी लावनाचे प्रयत्न सुरू असून दिवाळीपूर्वी पुलावरती गर्डर टाकून काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. झरी खाडी पुलाचे काम पूर्ण झाल्यास वारंवार पाण्याखाली जाणार्या पुलामुळे विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळणार असून जलद वाहतूक होण्यास फायदेशीर ठरणार आहे.