Wild mushrooms Palghar forest : पालघरच्या रानातील आळंबी आदिवासी बांधवांसाठी ठरतेय वरदान
खानिवडे ः दिसायला अगदी मशरूम सारखी पण विशिष्ट प्रकारच्या वेगळ्याच चवीची , आरोग्यासाठी गुणकारी अत्यंत चवीची पण काही दिवसांपुरती उगवणारी आणि जेव्हा उगवते त्याच्या काही तासांतच पूर्ण परिपक्वतेकडे जाणारी रानभाजी म्हणजेच शाकाहारी जंगली अळंबी. रानातील या अळंबी चा खास खवय्या वर्ग आहे .दरसाल श्रावणात ही भाजी बाजारात केव्हा येते याची प्रतीक्षा खवय्यांकडून केली जाते. जर नवख्याने पहिल्यांदा ही भाजी खाल्ली की तिची चव कायमस्वरूपी त्याला पुन्हा पुन्हा भाजी खाण्यास प्रवृत्त करतेच.अशी ही भाजी सद्या पालघर जिल्ह्यातील रानात उगवायला सुरवात झाली आहे.
या भाजीला मोठी मागणी असल्याने रानोमाळी हिंडून ही भाजी गोळा करणार्यांना चांगल्या रोजगाराचे साधन ठरत आहे . वसईतील गाव खेड्यात ही भाजी विक्रीसाठी दारावर आल्याचे पाहता क्षणी खरेदीदार विक्रेत्याच्या टोपल्याच्या भोवती घोळका करून लागलीच खरेदी करतात.त्यामुळे ही भाजी विक्री करण्यासाठी खप जास्त खटाटोप करावा लागत नाही.
पालघर जिल्ह्यात दरसाल पावसाळ्यात औषधी गुणांनी युक्त, आरोग्यवर्धक आणि वेगवेगळ्या व विशिष्ट चवीने भरपूर असलेल्या विविध रान भाज्या नैसर्गिकपणे रानावनात उगवत असतात. यातीलच एक अत्यंत चविष्ट आणि दुर्मीळ मानली जाणारी भाजी म्हणजे रान अळिंबी. ही भाजी दिसण्यात मशरूमचे एक रूप असले तरी मशरूमपेक्षा कैक पटीने चविष्ट आणि आयुर्वेदिक भाजी आहे. म्हणूनच वर्षातून एकदाच मिळणार्या या भाजीची खवय्ये वाट पाहत असतात. तर या भाजीच्या विक्रीतून आदिवासीं कष्टकरी कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार उपलब्ध होत आहे.
जंगलात पावसाळ्याच्या पहिल्या हंगामात आढळणारी अळंबी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. दाट जंगलामध्ये ती उगवते. अळंबीचे फूल पूर्ण उमलण्यापूर्वी जी अळंबी असते तीला मोठी मागणी आहे. पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात बहुतांश घरात जेवणात अळंबीचा बेत हमखास असतो. सध्या पालघर जिल्ह्यातील जंगलात ठिकठिकाणी अळंबी उगवली आहे. सकाळी जंगलात जाऊन अळंबी आणणे हा अनेक जंगल भागातील रहिवाश्यांचा दिनक्रम झाला आहे.
अळंबी उगवण्याची प्रक्रिया सुरू होताना सुरुवातीला बारीक तुरा असतो, नंतर त्याची अंडी तयार होतात आणि नंतरची प्रक्रिया म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये रुपांतर होते. ज्याने एकदा अळंबी खाल्ली, तो पुढच्या वर्षी हमखास तिची वाट पाहतो. पालघर जिल्ह्यातील घनदाट जंगलात हि भाजी जेव्हा उगवते तेव्हा काही तासातच परिपक्कवतेकडे वाटचाल करते. त्यामुळे विशेष करून ही भाजी दिसताच क्षणी गोळा करावी लागते. त्यामुळेच ही भाजी मिळवणे हे एक जिकरीचे व अनुभवाचे काम असते. विशेष करून जंगली अळिंबी गोळा करताना योग्य खाण्यालायक असल्याची खात्री करूनच निवडून घ्यावी लागते.

