

वाडा : जिल्ह्यातील गोरगरिबांचा प्राधान्याने विकास व्हावा या प्रमुख हेतूसाठी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवीन ३६ वा जिल्हा १ ऑगस्ट २०१४ साली अस्तित्वात आला. जिल्ह्याकडे जाण्यासाठी मागील १० वर्षात सोईसुविधा आहे तितक्याच असून व्याप मात्र अजून वाढत आहेत. अहमदाबाद मार्गावर मस्ताननाका येथे प्रचंड वाहतूककोंडी होत असून मनोर गावातून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे.
पोलीस प्रशासन मात्र याबाबत डोळ्यांवर हात देऊन असल्याचे लोकांचे म्हणणे असून वाडा येथून ४७ किमीसाठी जिल्हा गाठायला तब्बल अडीच ते तीन तासांचा अवधी लागत आहेत. वाडा ते टेननाका या २५ किमी अंतराच्या महामार्गाची अवस्था सध्या भीषण असून खड्ड्यांचा अडथळा पार करून आले की अहमदाबाद महामार्गावर मस्ताननाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी आपली वाट बघत असते.
कुणाचाकुणाला ताळमेळ नसून काही ठिकाणी संथ गतीने रस्त्याची दुरुस्ती तर काही ठिकाणी अवैध पार्किंग रस्त्याची गळचेपी करतांना पहायला मिळते. शनिवारी उड्डाणपुलाच्या वर काम हाती घेतले मात्र कोणतीही काळजी न घेतल्याने सिमेंट व वाळूचे काँक्रिट अनेक गाड्यांवर कोसळल्याचे वाहनचालकांनी सांगितले. मनोर गावातील चिंचोळ्या मार्गावर आधीच फेरीवाल्यांनी आपले हातपाय पसरले असून त्यात बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर वाहने पार्किंग करीत असल्याने वाहनचालकांची दमछाक होते.
गोवाडे व वाघोबा खिंड, मासवण, डुंगीपाडा या ठिकाणी देखील वाहतूककोंडी मुळे वाहनांचा वेग मंदावतो. वाडा ते पालघर हे खरेतर तासभराचे अंतर आहे मात्र कृत्रिम अडथळ्यांमुळे ते अंतर वाढले असून याचा फटका नागरिकांना सोसावा लागतो. जिल्ह्याच्या या मार्गावर खरेतर पोलिसांची बारीक नजर पाहिजे मात्र कुठेही पोलिस वाहतूककोंडी सावरताना दिसत नसून लोकांनी अजून किती त्रास सहन करायचा असा प्रश्न विचारला जात आहे.
वाडा - मनोर रस्त्याची दुर्दशा झाली असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, त्यातच आता मस्ताननाक्यासह मनोर गावात वाहतूककोंडी बिकट झाली असून शहराकडे जायचे म्हणजे पूर्ण दिवस हाताशी असायला हवा, ठाण्याकडे जाणाऱ्या लोकांची हिच अवस्था असून पालघरकडे जाणेही देखील डोक्याला ताप झाला आहे.
मुकेश पाटील, वाहनचालक, वाडा