वाडा : वाडा नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रात नव्याने कर आकारणी केली असून मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. निवासी व व्यवसायिक मालमत्तेवर आकारण्यात आलेला कर अन्यायकरण असून कर आकारणीचा पुनर्विचार करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले होते. नगरपंचायतीने मात्र सकारात्मक कार्यवाही न केल्याने शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयासमोर रहिवाशांनी तीव्र आंदोलन छेडले. करवाढ रद्द करा अन्यथा काळी दिवाळी साजरी करू असा इशारा उबाठा गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील एकही नगरपंचायतीने अशा पद्धतीने करवाढ केली नसताना वाडा नगरपंचायत हा घाट का घालीत आहे असा सवाल उपस्थित करून नगरपंचायतीची एक ही शाळा नसताना आकारण्यात आलेला शैक्षणिक कर व एकही झाड लावलेले नसताना आकारलेला वृक्ष संवर्धन कर जुलमी व संतापजनक आहे. निवडणुकांच्या पूर्वी जनतेला फूस लावण्यासाठी तिजोऱ्या खाली करायच्या व आता सरकार चालवायला पैसा नसल्याने सर्वसामान्यांची कर वाढीच्या रूपाने लूट करायची असा घणाघात ज्योती ठाकरे यांनी केला आहे.
वाढीव कराने कंबरडे मोडले
वाडा हा पालघर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत येणारा तालुका असून या नगरपंचायतीत आदिवासी बहुल लोकसंख्या आहे. वाढीव कराने गोरगरिबांचे कंबरडे मोडले असून याचाच निषेध करण्यासाठी शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयासमोर हा मोर्चा काढला होता. विरोधी पक्षातील बहुतांश कार्यकर्ते, नेते व वाडावासीय या मोर्चात सहभागी झाले असून नगरपंचायत प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.