

वाडा : वाडा तालुक्यात औद्योगीक क्षेत्र प्रचंड विस्तारले असून वाडा परिसरात आगीच्या घटना रोखण्यासाठी नगरपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून तालुक्याची ही मागणी सत्यात उतरल्याने खरेतर तालुक्यात सुरक्षित वातावरण निर्माण झाले, मात्र अपुऱ्या सोईंमुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कोने गावातील फोम उत्पादित करणाऱ्या कंपनीला बुधवारी आग लागली असताना ती आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणारे कर्मचारी मात्र सुरक्षा साधनांशिवाय वावरताना पाहायला मिळाले. अपुऱ्या यंत्रानेमुळे आग आटोक्यात आणताना देखील अडचणी निर्माण झाल्या या प्रकाराबाबत लोकांनी संताप व्यक्त केला.
वाडा नगरपंचायत प्रशासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध केल्याने आगीच्या लहानसहान घटना रोखण्यासाठी याचा मोठा फायदा होत आहे. 6 कर्मचारी या यंत्रणेत सहभागी असून कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट 2024 पासून अनेक आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले असून वाडा शहरातील काही घटनांचाही यात समावेश आहे. बुधवारी कोने गावात फोम कंपनीला लागलेली भीषण आग विझवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांची अवस्था बघता त्यांनाच पुरेशा सुरक्षेची गरज असल्याचे अनेकांनी सांगितले.
भयानक आगीच्या वेळी कर्मचारी अत्याधुनिक पद्धतीने सुरक्षित असणे बंधनकारक असून अन्य सुरक्षा यंत्रणा देखील त्यांकडे उपलब्ध असायला हवी. वाडा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.
हेल्मेट, लाइफ जॅकेट, रोप, हेडलॅम्प, हातमोजे, कटर, टूल बॉक्स, सुरक्षा कपडे अशी अनेक अत्याधुनिक पद्धतीची साधने कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असायला पाहिजे. वाडा नगरपंचायत अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे मात्र यातील अनेक वस्तू उपलब्ध नसून यामुळे इतरांचे जीव वाचविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव मात्र रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.
फायरसेफ्टी विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असता त्यांनी मंजुरी दिली तसेच 87 लाखांच्या निधीला जिल्हा नियोजन व विकास मधून उपलब्ध झाला आहे.3 नोव्हेंबरला मंजुरी मिळाली मात्र 4 तारखेपासून आचारसंहिता लागू झाल्याने वस्तू खरेदीची रखडली आहे. मात्र निवडणुका पार पडल्यावर याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल.
मनोज पष्टे, मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत