

वाडा : शेतकरी व मजूर यांचे मागील अनेक वर्षांपासून असलेले संतुलन आता विविध कारणांमुळे बिघडलेले दिसतं असून मजूर मिळत नाहीत या फक्त एका कारणामुळे अनेकांनी भातशेती करणे सोडल्याची अनेक उदाहरणे वाडा तालुक्यात पहायला मिळतील. सरकारकडून मिळणारी मोफत प्रलोभने, तरुण मजुरांची शेतीकडे पाठ यात भर घालीत असून यावर्षीही मजुरांच्या अभावी अनेकांची भातशेती रखडण्याची चिन्ह आहेत.
पावसाची सुरुवात महिनाभर उशिराने झाली तसेच आगमनाच्या वेळीच मुसळधार सुरुवात झाल्याने पेरण्या वाहून गेल्याने आधीच शेतकरी चिंतेत आहे. दरवर्षी महागलेली बियाणी, खते व औषधे, निसर्गाचा लहरीपणा तसेच डिझेलच्या किंमती वाढल्याने महागलेली यांत्रिक शेती शेतकऱ्यांना बेजार करीत आहे.
मजुरांचा तुटवडा ही नवीन समस्या शेतकऱ्यांना बेजार करीत असून तालुक्यात मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत शेती लागवड करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वाडा तालुक्यात कागदोपत्री १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात असून प्रत्यक्षात ही आकडेवारी निम्मेवर आल्याचे काही शेतकरी सांगतात. शेतीसाठी लागणारा बहुतांश मजूरवर्ग अनेकदा नाशिक व जव्हार भागातून आणला जायचा मात्र स्वतःच्या वनपट्ट्यात केली जाणारी शेती व सरकारच्या मोफत योजनांमुळे मजूर कामावर येण्यास तयार होत नाही,असेही अनेक शेतकऱ्याचे म्हणने आहे. मजुरांची समस्या असतांना अनेक शेतकरी भातशेती लागवडीचा आटापिटा करीत असून ज्याच्याकडे घरचे मजूर आहेत त्यानेच शेती करावी असे बोलले जात आहे.