

खानिवडे ः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार पूर्वेतील सकवार-भारोळ हद्दीत एका मालवाहू अवजड वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन जळून खाक झाले आहे. धावत्या वाहनाला लागलेल्या आगीने येथे एकच घबराट पसरली होती.
चोवीस तास वाहनांच्या वर्दळीने अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून रेतीच्या गोण्याने भरलेला (डीडी ०१/ सी ९६९०) क्रमांकाचा ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता . मात्र वाहनात काही तांत्रिक बिघाड होऊन अचानकपणे धूर येऊ लागला .त्यानंतर लागलीच आग लागली.आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र तो पर्यत वाहन जळून खाक झाले होते. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रक शॉट सर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. या आगीमुळे काही काळ मुंबई वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.मात्र विरार वाहतूक पोलिसांनी योग्य नियंत्रण करून वाहतूक सुरळीत केली.