

पालघर : विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 17 वर पोहोचला आहे. बचाव पथकांना गुरुवारी ढिगार्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे या भीषण दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली आहे. याप्रकरणी वसई - विरार महापालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बिल्डरला अटक केली असून परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर बचाव पथकांना ढिगार्याखाली आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी घडली. एक वर्षाच्या चिमुकलीच्या वाढदिवसाचा सोहळा सुरू असतानाच इमारतीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि आनंदाचे क्षण क्षणात शोकामध्ये बदलले. या दुर्घटनेत वाढदिवस साजरा होत असलेल्या चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेतून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले, वाढदिवसाच्या पार्टीत लोक नाचत होते, आनंद साजरा करत होते आणि अचानक संपूर्ण इमारत कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक आक्रोश करत होते. स्थानिक रहिवाशांच्या मते, यापूर्वीच्या इमारत दुर्घटनांप्रमाणे या इमारतीला कोणतेही तडे गेले नव्हते किंवा धोक्याची कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. अचानक इमारत कोसळल्याने परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. बिल्डर आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे. प्रशासनाने नव्याने ओळख पटलेल्या 8 मृतांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये गोविंद सिंग रावत (28), शुभांगी पवन साहेनी (40), कशिश पवन साहेनी (35), दीपक सिंग बेहरा (25), सोनाली रुपेश तेजाम (41), हरीश सिंग बिश्त (34), सचिन नेवळकर (40) आणि दीपेश सोनी (41) यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी गरज्ञहरी यांनी सांगितले की, बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु ढिगार्याखाली आणखी कोणी अडकले नाही याची पूर्ण खात्री झाल्यावरच ते थांबवले जाईल. दुर्घटनेतील जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्व बाधित कुटुंबांची तात्पुरती सोय चंदनसार समाजमंदिरात करण्यात आली असून त्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.