

विरार : येथील अर्नाळा परिसरात रविवारी (दि.२२) सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, एका ५५ वर्षीय प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक पूनम वरठा या तीन प्रवासी महिलांना घेऊन आगाशी येथून अर्नाळा येथे जात होत्या. सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटीसमोर विरुद्ध दिशेने आलेल्या अर्नाळा-शिर्डी बसने (चालक - राजू शंकर गांगुर्डे) रिक्षाला समोरून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला.
या दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी कविता नितीन कोलगे (वय ५५, रा. जुना कोळीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मीनाक्षी योगेश पाटील (रा. विरार पूर्व) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर चालक राजू गांगुर्डे (रा. मनमाड) हा बस सोडून पळून गेला असून, अर्नाळा सागरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रिक्षाचालक पूनम वरठा यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.