विक्रमगड : तालुक्यात भातझोडणी अंतिम टप्पात तालुक्यातील मलवाडा, आलोंडे, साखरा, पाचमाड, तलवाडा परिसरात भात झोडणी अंतिम टप्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. भात झोडणीला सर्वत्र सुरवात झाली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. तर भात झोडणीसाठी व मळणीसाठी मजुरांची चणचण भासत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा त्रस्त झाला आहे. तालुक्यात दिवाळी मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाची नासाडी झाल्यामुळे तसेच भात पिकाची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत व पावसाने सतत उघडीप दिल्याने रखडलेली भात झोडणी कामे अंतिम टप्यात आली आहेत.
मात्र ही कामे एकाचवेळी सुरू झाल्याने तालुक्यात मजूर मिळणे कठीण झाले आहे. तसेच भात कापणीसाठी वाढीव मजुरी देऊन कशीबशी शेतक-याने भातकापणी केली. परंतु झोडणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे.
विक्रमगड तालुक्यात खेडो -पाडी सध्या स्थितीत शेतात खळा तयार करून भल्या पहाटे बळीराजा थंडीत अंधूक प्रकाशात कामाला सुरुवात करतो. दोनशे ते पाचशे भाताच्या भाऱ्यांची गोलाकार उडवी रचून त्यातील भारे सकाळी 10 वाजेपर्यंत झोडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. यावेळी झोडणीसाठी भारे जास्त असतील आणि मनुष्यबळ कमी असेल तर दुपारच्या भोजनानंतर 3.30 वाजता पुन्हा झोडणीला सुरुवात होते.
उन्हात झोडणी केली तर पेंढ्यामुळे अंगाला खाज सुटण्याचा धोका असतो. दरवर्षी निसर्गाचा अनुभवावा लागणारा लहरीपणा, त्यात मोठ्या प्रमाणावर होणारी भात पिकाची नासधूस आणि शेतमजुरांची भरमसाठ वाढलेली मजुरी, शेतमजुरांची कमतरता, बियाणांसह खतांचे वाढलेले दर आणि शेवटी शेतीमालाला मिळणारा अल्पस्वल्प हमी भाव या कारणांमुळे शेती नाइलाजास्तव करायला लागत असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवितात.
सद्या स्थितीत विक्रमगड तालुक्यात भात झोडणी अंतिम टप्पा मध्ये आली आहे. काही भागात भात झोडणी झाली आहे. मजुरांची कमतरता, वाढती मजुरी,भात बियाणे,खते,औषधे याचे वाढते भाव, निसर्गाचा लहरी पणा मुले होणारे शेतकऱ्यांचे नुकसान त्या मानाने भाताला अत्यल्प हमी भाव या मुले शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कमळाकर भोईर, शेतकरी,मलवाडा