

वसई : रेंज ऑफिस ते भोयदापाडा, अग्रवाल उद्योगनगर, वालीव फाटा सातीवली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या राज्य रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पादचारी आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, मात्र वसई विरार मनपाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याबद्दल शिवसेना (उ बा ठा) तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी संताप व्यक्त करून, या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रेंज आफिस ते भोयदापाडा, अग्रवाल उद्योगनगर, वालीव फाटा रस्त्यावर रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे छोटया मोठया अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली जात असून,नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तरीही याबाबत मनपाच्या अधिकार्यांना सोयरसुतक नाही.
वसई विरार मनपा प्रशासनाचे नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे खड्डे येत्या आठवडाभरात जर दुरुस्त केले नाही, तर सर्व नागरिकांना घेऊन मनपा प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, यांची नोंद पोलीस प्रशासन व मनपाच्या अधिकारी यांनी घ्यावी, असा इशारा शिवसेना (उ बा ठा) तालुकाप्रमुख मोटे यांनी संताप व्यक्त करीत दिला आहे.