

वसई: राज्यातील 21 महापालिकांपैकी बहुतांश महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेत मात्र याबाबत अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. स्वीकृत सदस्य निवडीबाबत असलेल्या पक्षीय संख्याबळाच्या नियमानुसार या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला 6, तर भाजप-शिवसेना महायुतीला 4 स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे.
बहुजन विकास आघाडीकडून सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्गज उमेदवारांसह काही नवीन होतकरू चेहरे तर भाजपकडून सुद्धा पराभूत आणि काही नवे उत्साही चेहरे महापालिकेत मागील दारातून जाणाऱ्या, पण तरी प्रतिष्ठेच्या ठरू पहात असलेल्या या स्वीकृत नगरसेवकांच्या बिरूदावलीसाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.
पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडून वेगवेगळ्या राजकीय तडजोडींसाठी आपापल्या पक्षातील शेकडो इच्छुकांना आश्वासनांचा गुळ लावण्यात आलेला असल्यामुळे नेमके घ्यायचे कुणाला आणि दुखवायचं कुणाला? असा धर्मसंकटीय पेच पक्षनेतृत्वांपुढे निर्माण झाला आहे. यामुळेच इच्छुक स्वीकृत नगरसेवकांसाठी अदयाप दिल्ली दूर ठरलेली दिसत आहे.
त्यामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकांबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याचे चित्र आहे.वसई-विरार महापालिकेच्या सदस्यांची संख्या ही 115 आहे. स्वीकृत सदस्य निवडताना एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा 10 यामध्ये जी संख्या कमी असेल तेवढे स्वीकृत सदस्य निवडले जातात. 115 या संख्येच्या दहा टक्के म्हणजे 11.5 ही संख्या येते.
त्यामुळे 10 ही संख्या कमी असल्याने या महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. तसेच राजकीय पक्षांनी निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. बहुजन विकास आघाडी मोठी पक्षीय असल्याने 6 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये त्यांना सहापैकी सहा स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे. भाजपचे 4 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
मात्र शिवसेनेला सोबत घेऊन महायुती म्हणून भाजपने ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे 4 स्वीकृत सदस्यांचा कोटा त्यांना मिळावा, यासाठी आवश्यक असलेले 44 चे संख्याबळ महायुतीकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूर, उमा पाटील, हार्दिक राऊत, माजी महापौर रुपेश जाधव, बविआच्या चिन्हावर लढलेले धनंजय गावडे यांच्यासह आणखी काही चर्चेतील उमेदवार पराभूत झाले आहेत.
त्यामुळे पराभूत झालेल्या सुमारे तीन उमेदवारांसह पक्षवाढीला पूरक ठरतील असे तीन युवक कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी स्वीकृत सदस्य म्हणून संधी देणार असल्याचे मानले जात आहे. बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या गटनेत्यांकडून स्वीकृत सदस्यांची नावे विभागीय आयुक्तांकडे सादर केली जाणार आहेत.
संबंधित नावांची पात्रता तपासली जाईल व पात्र असलेली नावे महासभेच्या पीठासन अधिकारी महापौर यांच्याकडे पाठविली जातील. त्यानंतर पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची नावे महापालिकेकडून जाहीर करण्यात येतील.