

वसई : अनिलराज रोकडे
वसई विरार महानगरपालिकेच्या 66 जागा जिंकत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक बहुजन विकास आघाडीने काँग्रेस आणि मनसे यांना सोबत घेऊन संयुक्त आघाडी करून लढली. काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी शिट्टी या चिन्हावर ही निवडणूक लढली. बहुजन विकास आघाडीच्या मित्रपक्षांना, काँग्रेसला चार तर मनसेला एका जागी यश मिळाले. बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षांना एकूण 71 जागा मिळालेल्या असल्यामुळे महापौर त्यांचाच होणार आहे.
तर भाजप-शिवसेना महायुतीने 44 जागा संपादित केल्या असल्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांचा होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण 22 जानेवारी रोजी पडणार आहे. त्या दरम्यान, आज सायंकाळी उशिरा बहुजन विकास आघाडीने आपला गटनेता निवडला आहे. या गटनेतेपदी वसईतील दक्षिणात्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी महापौर, हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय आणि पहिल्या कला कडा महोत्सवापासून प्रचंड मोठे योगदान देणारे प्रवीण अण्णा शेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मावळत्या महापालिकेमध्ये प्रवीण शेट्टी हे अखेरचे महापौर होते. यंदाच्या निवडणुकीत वसई गाव परिसरातील बहुसंख्य नगरसेवकांच्या विजयात शेट्टी यांचा मौलिक वाटा असून, शेट्टी यांचं तळागळाच्या माणसापर्यंतचे कर्तृत्व आणि सर्वसमावेशक नेतृत्व वसईकरांनी याहीपूर्वीच स्वीकारलं आहे. ते दक्षिणात्य समाजातून आलेले असले, तरी जन्मजात वसईकर आहेत. अस्खलित मराठी बोलणं किंवा मराठीत सुसंवाद साधणं हे त्यांना इतक जमत, की त्यांच्यापुढे युक्तिवाद करणारा मूळचा मराठी माणूसही बऱ्याच वेळा फिका ठरतो.
आज सायंकाळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, नारायण मानकर, अजीव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या 71 नगरसेवकांच्या सहभागाने झालेल्या बैठकीत बहुजन विकास आघाडीच्या गटनेतेपदी प्रवीण शेट्टी यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीमध्ये सर्वानुमते प्रवीण शेट्टी यांच्या नावावर गटनेता म्हणून शिकता मुहूर्त करण्यात आले आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडी सोबत एक प्रमुख पक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील यांनी आज सांगितले की, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आलेले असून, आपल्या मतदारांना सोयीचे व्हावे म्हणून आम्ही स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढलो असलो तरी, आमचे पाच सदस्य हे काँग्रेसचेच आहेत. आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचा स्वतंत्र गट नोंदणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. येत्या एक-दोन दिवसात जिल्हाध्यक्ष ची चर्चा करून, काँग्रेसच्या पाच नगरसेवकांचा स्वतंत्र गट नोंदणार आहोत.
वसई विरार महापालिकेच्या निवडणूकीत विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यात 50 माजी नगरसेवक ही निवडणूकीच्या रिंगणात होते. नुकताच जाहीर झालेल्या निवडणूक निकालात 31 माजी नगरसेवक विजयी झाले आहेत. तर 20 जण पराभूत झाले आहेत. यात माजी महापौर रुपेश जाधव यांचाही समावेश आहे. वसई-विरार महापालिकेत 2015 मध्ये निवडून आलेले 50 माजी नगरसेवक ही निवडणुकीच्या रिंगणात होते. यात सर्वाधिक 37 माजी नगरसेवक हे बहुजन विकास आघाडीने मैदानात उतरविले होते. यापैकी 30 माजी नगरसेवक निवडून आले आहेत तर 20 नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागाला आहे. 30 माजी नगरसवेक पुन्हा विजयी झाले आहेत.बविआ चे 11 माजी नगरसेवकांचा या निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यात पंकज ठाकूर, हार्दिक राऊत, मिलिंद घरत, भरत मकवाना सुरेख कुरकुरे रुपेश जाधव उमा वृंदेश पाटील रिटा सरवैया किशोर पाटील वैभव पाटील माया तळेकर आदींचा समावेश आहेत.