

विरार : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा भस्मासुर उघड झाला आहे! वसई (पूर्व) येथील मनपाच्या औषध भांडारातून तब्बल दोन लाख गोळ्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जनतेच्या आरोग्यासाठी राखीव ठेवलेल्या औषधांचा असा खुला बंदोबस्त होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसई-विरार मनपाच्या वैद्यकीय विभागाने गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात औषधे मागवली होती. त्यातील सुमारे पाच लाख गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे दाखवण्यात आले, मात्र तपासात सुमारे दोन लाख गोळ्यांचा ठावठिकाणा नाही! म्हणजेच नोंदीतल्या गोळ्या हवेतील वाफ झाल्या की कुणाच्या खिशात गेल्या, हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे.
औषध भांडारातील नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने, या प्रकरणात फार्मासिस्ट, डॉक्टर, तसेच काही वरिष्ठ अधिकार्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोग्य विभागातील या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. औषधे गायब होत असताना, शासकीय दवाखान्यांमध्ये मात्र रुग्णांना आवश्यक औषधे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती अधिक संतापजनक आहे.
मनपा आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घोटाळ्याची चौकशी सुरू असून प्राथमिक अहवालात नोंदींची फेरफार, बनावट सही आणि औषध साठ्याचे अपुरे लेखाजोखा असे गंभीर आरोप समोर आले आहेत. मनपा प्रशासनाने आंतरिक चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे जप्त केली असून, गुन्हे शाखेलाही तपासासाठी जोडण्यात आले आहे.
या प्रकरणाने मनपा आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पारदर्शकतेबाबतचा दावा कोलमडला आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, दोषींना तत्काळ निलंबित करून प्रकरण न्यायालयीन चौकशीत पाठवावे.
आम्ही आवश्यकतेनुसार औषध साठा मागवतो. औषधे गोदामातून येऊन ठरलेल्या प्रमाणात वितरित केली जातात. मात्र, औषधे गायब झाल्याचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
डॉक्टर भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका