Vehicle Theft | वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये वाहने चोरीला
विरार : मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तलय क्षेत्रात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सकाळी पार्किंग केलेले वाहन सायंकाळी गायब होण्याचे चित्र वसई विरार नालासोपारा शहरात दिसून येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शहरांमधून आतापर्यंत ३२८ वाहने चोरी झाले आहेत. यामध्ये चार चाकी, टेम्पो, दुचाकी आणि ऑटो रिक्षा याचा समावेश आहे.
चोरी गेलेल्या वाहनांची शोध मोहीम पोलिसांकडून सुरू आहे मात्र शहरांत होणाऱ्या वाहन चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन, उधारी घेऊन घेतलेले वाहने चोरीला जात आहेत, मात्र चोरी गेलेली वाहने भेटणार तरी कधी? असा प्रश्न वसईकर पोलीस प्रशासनाला विचारत आहेत.
सतत होणाऱ्या वाहन चोरीमुळे शहरातील पोलिसांची पूर्णता झोप उडाली आहे, त्याचबरोबर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्था वर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाहन चोरीच्या घटना वसई विरार शहरात अधिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाहन चोरटे हे वाहन चोरून ग्रामीण भागात नंबर प्लेट कलर बदलून स्वस्त भावात विकतात. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांना पकडणे व वाहन मालकाला परत देण्यात मुश्किल होत आहे.
दरम्यान शहरात वाढणाऱ्या वाहनचोरीला जनता जबाबदार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, वाहन चालक हे आपले वाहन अशा ठिकाणी पार्किंग करतात ज्या ठिकाणी पोलिसांची कोणतीच सुरक्षा यंत्रणा नसते व शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काढण्यात आले आहेत त्यामुळे चोरट्यांना वाहन चोरणे सहज शक्य झाले आहे.
त्यातच सर्वाधिक दुचाकी वाहने चोरटे चोरण्यात पसंती करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपली वाहने सुरक्षित जागेत पार्किंग करावे व चोरीपासून वंचित राहावे असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

