

Bahujan Vikas Ahadhi Agitation
वसई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन विकास आघाडीच्या वतीने बुधवारी (दि.२२) विरार येथील विवा कॉलेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर झाल्याचा निषेध नोंदवत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण आणि हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यायाविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत बहुजन विकास आघाडी कायम ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, माजी महापौर नारायण मानकर, आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बहुजन विकास आघाडीच्या वतीने सायंकाळी ४ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले. वसईतील पार्वती क्रॉस ते नवघर-माणिकपूर महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.