

खानिवडे : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक वसई किल्ला सद्ध्या अधिकाधिक दुरवस्था सोसत आहे. गेली अनेक वर्षे वसई किल्ल्याच्या अनेक बुरुजांची जराही दुरुस्ती व देखभाल स्वच्छता न झाल्याने सदर बुरुजांची व तटबंदी भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. जर केंद्रीय पुरातत्व मुंबई विभाग अंतर्गत तातडीने उपाययोजना न झाल्यास सदर बांधकाम कोसळून जाण्याची भीती दुर्गसंवर्धकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत शेकडो ई-मेल दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी दुर्गमित्र, अभ्यास, भटकंती वर्ग, इतिहासप्रेमी माध्यमातून केंद्रीय पुरातत्व विभाग सायन ऑफिस मुंबई विभाग येथे पाठवण्यात आलेले होते. यावर आजपर्यंत एकही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने गेल्या तीन वर्षांत हा सर्व भाग खाजणात खचत चालला आहे. पर्यटकांना व विद्यार्थ्यांना आता वसई किल्ल्याच्या तटबंदीवरून मार्गक्रमण करणेही धोकादायक होणार असल्याचे चित्र समोर आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या इतिहास सफरीच्या अंतर्गत भटकंती करताना जंजिरे वसई किल्ल्याची तटबंदी अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून आलेले आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने याबाबत प्रत्यक्षात पाहणी करून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या अंगापासून 2,3,4 क्रमांकाच्या बुरुजांची तातडीने स्वच्छता व डागडुजी करणे आवश्यक आहे. निर्देश केलेल्या बुरुज व तटबंदीवर बेसुमार गवत व अनावश्यक मोठी काटेरी झुडुपे वाढलेली असल्याने या ठिकाणी मार्गक्रमण करता येत नाही. मुख्य बुरूजावर मोठं मोठी झाडे वाढल्याने तटबंदी व बुरुजास तडा भेगा गेलेल्या आहेत. यातील अनेक बुरुज कोणत्याही क्षणी कोसळून पडतील. बहुतेक भागात घोरपड, साप, आदींचा वावर वाढल्याने हा परिसर धोकादायक झाला आहे.
बुरुजांची अवस्था लक्षात घेता यावरील चर्या, जंग्या, फांजी, लादण्या हे अवशेष पूर्णपणे भुईसपाट होतील. तटबंदीच्या खालील भागात पाण्याचा निचरा होणारी मार्ग साधने पूर्णपणे बंदिस्त झाल्याने याठिकाणी दलदल वाढीस लागली आहे. निर्देश करण्यात आलेल्या सर्व भागातील तटबंदीवर चालणे व मार्गक्रमण करणे अत्यंत धोकादायक झालेले आहे. यातच अंतर्भूत असलेल्या ऐतिहासिक भुयारी मार्गात पावसाळ्यातही पर्यटक, विद्यार्थी वर्ग अत्यंत धोकादायक पद्धतीने मार्गक्रमण करत आहे. या भागात तातडीने स्वच्छता उपक्रम राबवून या धोकादायक बांधकामाचे तपशील पुरातत्वीय ऑडिट करून डागडुजी करणे आवश्यक आहे, असे निवेदन अनेक महिने दुर्गमित्रांकडून सादर करण्यात आले आहे.