

खानिवडे : वसईत वणव्यांचा प्रकोप सुरू झाला आहे. गुरुवारी रात्री खानिवडे जंगलात वणवा लावण्यात आला होता. तो भडकून पहाटेच्या वेळी या जंगलाखालून जाणाऱ्या मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या कडे पर्यंत पसरला होता. यामुळे पसरलेला धुराळा व आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसून येत होत्या असे पहाटे महामार्गाच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
दरसाल उन्हाळा सुरू झाला की, वसई पूर्वेतील जंगलांना आगी लावण्याचे प्रकार सुरू होतात. यंदा आतापर्यंत तुंगरेश्वर अभयारण्यासह , जीवदानी गड,,कोपरचा डोंगर टकमक गड, खानिवड्या च्या जंगलात आगी लावून वणवे भडकवले गेले आहेत .हे वणवे लागत नसून मुद्दाम भडकवले जात असल्याचा स्थानिकांना ठाम विश्वास असून आगी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक बोलून दाखवत आहेत .तर वणव्यात पर्यावरण राखणाऱ्या वन संपदेवर मोठा परिणाम होत असून निष्पाप वन्यजीवांचा संहार होत असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे. तर वन विकास महामंडळ आणि वन विभाग यांनी वसईच्या वणव्यांकडे डोळेझाक केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
वसईच्या वणव्यात वनसंपदा नष्ट होत आहेच , मात्र सर्वात जास्त भरडले जात आहेत ते वन्यजीव. यामुळे आधीच कमी संख्येत आलेल्या वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. या आगी लावणाऱ्यांचा थांग पत्ता ही मिळत नाही. कारण ते निर्मनुष्य जंगलात बिनधास्त आगी लावतात. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांना शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. ज्यावेळी आगी लावणारे एक दोन पकडले जातील व त्यांना शिक्षा होईल तेव्हा इतरांना जरब बसेल. या दृष्टीने वन विभागाने पावले उचलणे गरजेचे आहे.
विलास पाटील , पर्यावरण प्रेमी नागरिक