Vasai Farming Technology Program
खानिवडे : वसई तालुक्यात शेतकर्यांना खरीप हंगामाच्या सुरवातीला आधुनिक शेती लागवड व शासनाच्या शेती विषयक असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी सहा गावांत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल पालघर जिल्हा येथील शेती तज्ञ उपस्थित होते. केंद्र शासनाच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत या शेती शाळांचे आयोजन 29 मे ते 12 जून या पंधरवड्यात करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ भरत कुशारे, अशोक भोईर, मत्स्य संशोधन केंद्राचे डॉ सुनील कुमार नायर, सहाय्यक कृषी पृथ्वीराज पाटील, संजय बरफ यांच्यासह खानिवडे येथील शेती शाळेला सरपंच दिनेश परेड, उपसरपंच पूर्वा पंकज कुडू, सदस्य आणि शेतकरी हजर होते.
या शेती शाळेमध्ये आधुनिक शेत मशागतीसह आधुनिक शेती लागवड, शेतमशागतीसाठी वापरण्यात येणार्या यांत्रिक औजारांची देखभाल कश्याप्रकारे करायची तसेच निगा कोणत्या पद्धतीने राखल्यास औजारांच्या देखभालीचा खर्च कमी करता येऊन आयुष्य वाढू शकते. तर शेतीपूरक व्यवसाय म्हणून धान्य, फळे, फुले व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची माहिती तसेच डाळ मिल विषयी माहिती देण्यात आली. यामध्ये महिला शेतकरीही सहभागी झाल्या होत्या. या शेतीशाळेच्यावेळी एकात्मिक कीड नियोजन, वाण निवड, सेंद्रिय वापर, भात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया, भात लागवडीच्या विविध पद्धती, बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिका वाचन कसे करावे व खत वापर आदींची माहिती दिली. तसेच शेतीच्या आधुनिक लागवडीच्या चित्रफीतही दाखवण्यात आल्या.
या शेतीशाळेमुळे आम्हाला आम्ही कसत असलेल्या पारंपरिक भात शेती ऐवजी आधुनिक पद्दतीने शेती लागवड नियोजन कसे करावे याचे बारकावे कळण्यात मोठी मदत झाली आहे. त्यामुळे येत्या हंगामात आम्ही त्याचा उपयोग शेतीसाठी नक्की करून पाहणार आहोत. असे उपस्थित शेतकर्यांनी सांगितले.