Vasai News | वसईतील ख्रिस्ती युवकांनी सासवड येथे विठ्ठलाच्या वारीत सहभागी होत दिला सर्वधर्मसमभावाचा अनोखा संदेश!

ख्रिस्ती युवकांचा वारीत सहभाग होत विठू नामाचा गजर, ख्रिस्ती भक्तांनी स्वतः वारकरी होऊन पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची पहिलीच घटना
Vasai News
वारीत सहभागी झालेले वसई येथील ख्रिस्ती बांधव
Published on
Updated on

अनिलराज रोकडे

वसई : पंढरपूरच्या दिशेने टाळ मृदुंगांच्या गजरात निघालेली विठ्ठलाची वारी सर्वांनाच वेड लावते....! श्रद्धा आणि भक्तीच्या या वेडात, मग धर्म आणि जातीच्या भिंतीही नकळत कशा तुटून पडतात.... आणि त्यातून या वारीला सर्वधर्मीय आणि समभावाचे स्वरूप कसे प्राप्त होते, याचा प्रत्यय शनिवारी वसईतल्या ख्रिस्ती श्रद्धाळूंनी वारीत प्रत्यक्ष 'वारकरी' म्हणून शनिवारी सहभागी होऊन घेतलेल्या आनंदातून आला आहे....! वसईतील अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि ख्रिस्ती लेखकांनी संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत जनाबाईं आणि मीराबाई यांच्यावर पीएचडी, तथा अन्य संशोधनात्मक लेखन यापूर्वी केलेले आहे. मात्र ख्रिस्ती भक्तांनी स्वतः वारकरी होऊन पंढरीच्या वारीत चालत प्रवास करून घेतलेल्या स्वानुभवाची ही पहिलीच घटना असल्याने तिची कुतूहलाने चर्चा होत आहे!

वसईतील परस्परांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन, हिंदू आणि ख्रिस्ती धर्मीय उभयपक्षी जपला जाणारा सांस्कृतिक एकोपा तसा नवा नसला, तरी ख्रिस्ती युवकांनी पंढरीच्या वारीत सामील होऊन विठोबाचा केलेला "जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल" आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम"चा जयघोष नवा असल्यामुळे या युवकांचे कौतुक होत आहे.

वसईतील ख्यातनाम वकील, तथा जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. जॉर्ज फरगोस यांच्या संकल्पनेतून वारी सहभागाच्या या धर्मीय एकोप्याचा संदेश देणाऱ्या उपक्रमास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ऍड. जॉर्ज यांची ही संकल्पना ऍड. अजय परेरा, ऍड. अविश फरेरा, ऍड. प्रीतेश देशमुख, ऍड. सुयश ठाकूर आणि ऍड. हर्षल राऊत या वकील मित्रांनी उचलून धरली. या सर्वांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिवे घाट ते सासवड पर्यंत असे सुमारे 10 कि.मी. अंतर वारीत चालत आपला सहभाग घेतला.

याबद्दल वारीतील अनुभव आणि एकंदर प्रतिक्रिया विचारली असता, ऍड. जॉर्ज फरगोस यांनी सांगितले की, वारी म्हणजे भक्ती, समता, प्रेम आणि सेवाभाव यांचा अखंड प्रवाह. अनेक वारकरी मोठ्या भक्तीभावाने त्यामध्ये सहभागी होत असतात. माझे ज्येष्ठ सहकारी आणि मित्र ऍड. सिद्धेश नाईक हे दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. ती एक प्रेरणा होतीच आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून वारकरी संप्रदायाचा प्रसार करून त्याला जनमानसात अधिक दृढ केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे परिवर्तनवादी पुरोगामी विचार मला नित्य प्रभावित करतात. मलाही या ८०० वर्षापासून अखंडित सुरू असलेल्या परंपरेचा अनुभव घ्यायचा होता.

पंढरीची वारी हा फक्त प्रवास नव्हता, तर मनाला लाभलेला आत्मिक स्पर्श होता. लाखो वारकऱ्यांच्या ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात मी स्वतःला हरवून बसलो आणि विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने मन शांत झालं. लाखो पावलांत माझंही एक पाऊल होतं, अशी एक आध्यात्मिक संपत्ती लाभली. चंद्रभागेचा किनारा, टाळ-मृदुंगाचा नाद आणि डोळ्यांत समाधान, वारीने आयुष्यभर जपावी, अशी शिदोरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news