

पालघर ः पालघर तालुक्याचा ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे.वांद्री धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास धरण ओव्हरफ्लो झाले आहे.धरणाच्या सांडव्यातून पाण्याच्या विसर्ग सुरू झाला आहे.
वांद्री धरण तुडुंब भरल्याने उन्हाळी भात शेतीच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सुर्या प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या वांद्री धरणाची पाणी साठवण क्षमता 35 दशलक्ष घनमीटर आहे. वांद्री धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमार्फत वरई-सफाळे रस्त्यावरील सोनावे पारगाव पर्यंत,तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली पाडोसपाड्या पर्यंत सुमारे दोन हजार दोनशे हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भातशेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.वांद्री धरण पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वांद्री धरणाच्या सांडव्याखाली असलेल्या खडकातून सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन वाहणारे पाणी फेसाळत वाहत असते.फेसाळत वाहणारे पाणी आणि धरण क्षेत्रातील हिरवाई असे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.वांद्री धरणातून वाहणार्या फेसाळणार्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी वसई -विरार महापालिका, ठाणे आणि मुंबई भागातील पर्यटक मोठ्या संख्येने वांद्री धरण क्षेत्रात हजेरी लावतात.