

पालघर : पालघर तालुक्यातील जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा आणि गांजे परिसरात खैर तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.वनविकास महामंडळाच्या हद्दीत खैराचे दोनशे पेक्षा अधिक ओंडके सापडल्याने खळबळ उडाली आहे.ओंडके जायशेत गांजे रस्त्यालगतच्या जंगलात लपवून ठेवण्यात आले होते. वनविकास महामंडळाच्या कर्मचार्यांनी खैराचे ओंडके ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विरार येथील काष्ठ आगारात हलवले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरणाच्या बुडीत क्षेत्रालगत घनदाट जंगल आहे. या जंगलात सागवान आणि खैर यांसारख्या मौल्यवान वृक्षप्रजाती मोठ्या प्रमाणावर आहेत.जंगल वनविकास महामंडळ, दहिसर तर्फे मनोर आणि भाताणे वनपरीक्षेत्राच्या हद्दीत विभागले गेल्याने कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याचा फायदा तस्करांना होत आहे. या दुर्गम भागात पोहचणे अवघड असल्याने, तसेच काही तस्करांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने वनविभागाच्या कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. परिणामी तस्कर मोकाट सुटले असून, जंगलाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
खैर तस्करी रोखण्यासाठी वांद्री धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणी चौकी उभारण्यात आली आहे. मात्र या चौकीवर कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याचा तस्करांना फायदा होत आहे. रात्रीच्या वेळी चौकीवरील कंत्राटी कर्मचार्यांना धमकावणे, पैशाचे आमिष दाखवणे किंवा थेट गैरवर्तन करून तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा चौकी पूर्णपणे रिकामी असल्यामुळे तस्करांना मोकळे रान मिळत आहे.
खैर तस्करांकडून जंगलातील जुनी खैर झाडे कापून ओंडके तयार केले जातात. ओंडके इको कारसारख्या छोट्या वाहनातून रस्त्याच्या कडेला आणून लपवून ठेवली जातात. रात्रीच्या वेळी, जेव्हा गस्ती पथकांचे हालचाल कमी असते, तेव्हा या ओंडक्यांना मोठ्या टेम्पो किंवा इतर वाहनांतून जंगलाबाहेर नेले जाते.वनकर्मचार्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जाते.
जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील बहिरीफोंडा, ठाकूरपाडा भागात खैर तस्करांचा वावर आहे. तस्करीतून मिळणारा पैसा आणि सोपी कमाई यामुळे युवक गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत. वनविभागाच्या कर्मचार्यांवर दबाव टाकणे, धमकी देणे, त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये वन कर्मचार्यांच्या वसाहतीतील घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचीही माहिती समोर आली आहे.
खैर तस्करीमुळे पर्यावरणाचा, जंगलसंपत्तीचा मोठा र्हास होत आहे. वनविभागाच्या सुरक्षेसाठी अधिक मनुष्यबळ, आधुनिक साधने आणि योग्य नियोजनाची गरज आहे. वांद्री धरण चौकीवर कायमस्वरूपी कर्मचार्यांची नेमणूक, गस्ती पथकांचे प्रमाण वाढवणे आणि स्थानिकांच्या सहकार्याने गुप्त माहिती मिळवणे या पद्धतीनेच खैर तस्करीवर लगाम घालता येऊ शकतो.