Vadpada waterfall tourism : वडपाडा धबधब्याची पर्यटकांना भुरळ
वाडा : मच्छिंद्र आगिवले
वाडा हा निसर्गसंपन्न तालुका असून ग्रामीण भागात कोसळणार्या मुसळधार पावसामुळे हिरव्यागार डोंगराच्या कुशीतून जमिनीच्या दिशेने धावणारे अनेक लहान मोठे धबधबे पावसाळ्यात जणू जिवंत होतात. पावसात भिजायला ज्यांना कधीही आळस येत नाही, असे नागमोडी डांबरीरस्ते आपला रंग अजून घट्ट करीत या भागाचे सौंदर्य द्विगुणित करतात.
खोडाळा मार्गावर असलेल्या वडपाडा येथील धबधब्यावर तर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून या मार्गे त्र्यंबकेश्वरला जाण्यास जवळचा मार्ग असल्याने एक दिवसीय सहलीचा हा उत्तम पर्याय आहे.
पावसाळा आला की सर्वांना भटकंतीची लहर येणे साहजिक असून धबधबे, हिल स्टेशन, लहान मोठी धरणे अश्या अनेक ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. वाडा ते खोडाळा रोड हा पर्यटकांच्या पसंतीला उतरलेलं एक सुंदर ठिकाण असून सध्या या मार्गावर सौंदर्याचा जणू पेटारा उघडलेला पहायला मिळतो. पावसाळ्यात थंडगार हवा, धुके व हिरव्या भूमीसह दुधासारखे दिसणारे धबधबे मन प्रसन्न करतात.
एक दिवसाचे पर्यटन
वडपाडा येथील धबधबा तसा अतिशय सुंदर, स्वच्छ असला तरी असुविधांमुळे धोकादायक आहे, याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. निसरडे मार्ग, अस्वच्छ परिसर व दारुड्यांचा धिंगाणा येथील सौंदर्याला अनेकदा गालबोट लावतात, मात्र काही गोष्टी वगळता वडपाडा व खोडाळा रोड, देवबांध व जव्हार हे एक दिवसाचे पर्यटन करण्याचा उत्तम पर्याय आपल्याला नक्कीच सुखावणारे आहे.

