

पालघर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हरित वाढवण बंदर प्रकल्पला नागरिकांचा विरोध कायम आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात बंदर प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण किनारी भागात केले जाणार होते. बुधवारी सर्वेक्षण सुरू असताना बंदर परिघातील गावाच्या नागरिकांनी समुद्रकिनारी एकत्र येत आंदोलन व घोषणाबाजी करून हे ड्रोन सर्वेक्षण बंद करायला लावले. मोठ्या संख्येने नागरिक या सर्वेक्षणाच्या विरोधासाठी वाढवण समुद्रकिनारी जमले होते.
समुद्राच्या उच्चतम भरती रेषेसह लाटांचा ड्रोन सर्वे केला जात होता. ड्रोन सर्वेक्षण करणार्या संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता पोलीस बंदोबस्तामध्ये हे सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणाला गावातील नागरिकांसह वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती यांनी आंदोलन करत सर्वेक्षण करणार्या संस्थेच्या अधिकारी वर्गांवर आंदोलनकर्त्यांनी प्रश्नाचा भडीमार केला.
कोणत्या आधारे हा सर्वे केला जात आहे असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र कोणत्याही परवानगीचे पत्र अधिकार्यांना दाखवता आले नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने हे सर्वेक्षण सुरू केल्याचे पोलिसांचे आंदोलकांना म्हटले. मात्र अशी कोणतीही परवानगी दाखवली नसल्याचे तेथील गावकर्यांनी म्हटले.
सर्वेक्षण सुरु करण्याआधी वाढवण परिघातील ग्रामपंचायतच्या परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता थेट सर्वेक्षणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ज्या कंपनीला बंदर भरावाचे काम मिळाले आहे. ती कंपनी जोर जबरदस्ती करून काम सुरू करण्याचा घाट घालत असल्याचे आरोप यानिमित्ताने केले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार हे सर्वेक्षण किंवा अभ्यास निरी संस्थेकडून होणे अपेक्षित असताना त्रयस्थ संस्थेकडून विना परवानगी, पूर्वकल्पना न देता असे सर्वेक्षण करण्याचा उद्देश काय असा सवाल आंदोलकांनी विचारला. हे सर्वेक्षण थांबवण्यात आले.
प्रकल्पाबद्दल सर्वांनाच पुरेशी पारदर्शक माहिती आहे. काही जणांचा प्रकल्पाबाबत गैरसमज आहे. तो गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व पुढेही राहील. सर्वेक्षणासाठी आवश्यक ती सर्व तंत्र साधने, पोलीस बंदोबस्त, अधिकारीवर्ग उपलब्ध होते. मात्र समुद्राचे उधाण, पाऊस तसेच सोसाट्याचा वारा अशा खराब हवामानाच्या स्थितीमुळे बुधवारी हे सर्वेक्षण थांबवलेले आहे. सर्वेक्षण तात्पुरता थांबवण्यात आलेले असून भविष्यात चांगले हवामान व पोषक वातावरण तयार झाल्यानंतर येणार्या काळात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
बंदराचे ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना नागरिकांनी हा सर्वेक्षण हाणून पाडल्याचा दावा पालघर जिल्हा प्रशासनाने फेटाळला असून वस्तुस्थितीला धरून हा दावा नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हे ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी आयसी कंपनीमार्फत ड्रोन पाठवण्यात आले होते. मात्र सर्वेक्षणाच्या दिवशी पाऊस व सोसाट्याच्या वार्यामुळे ड्रोन सर्वेक्षण करणे शक्य नव्हते. सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन हवेत सोडताना ते वार्यामुळे स्थिरावत नव्हते. त्यामुळे ड्रोन मागे घेऊन हे सर्वेक्षण थांबवले गेले. वाढवण बंदरा संदर्भात काही जणांचे गैरसमज आहेत.
जिल्हा प्रशासन व जेएनपीटी यांच्या माध्यमातून त्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आलेलो आहोत. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीला अवगत केलेले आहे. तेथील सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांना याची कल्पना आहे. या संदर्भात दोनदा बैठका घेण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवरही प्रशासन व जेएनपीटी माध्यमातून बैठका झालेल्या आहेत.