Vadhavan Samruddhi connectivity : वाढवण महामार्गाची नाळ समृद्धीला जोडणार

तवा ते नाशिक भरवीर नव्या महामार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी
Vadhavan Samruddhi connectivity
वाढवण महामार्गाची नाळ समृद्धीला जोडणारpudhari photo
Published on
Updated on

पालघर ः वाढवण बंदर महामार्ग डहाणू तालुक्याच्या तवा पर्यंत बांधला जाणार आहे. हा मार्ग थेट नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भरवीर आमणे येथे समृद्धी महामार्गाला जोडणीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महामार्गाच्या विस्तारांतर्गत ही मान्यता मिळाली असून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2528 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. हा 105 किलोमीटर लांबीचा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास पाच तासावरून थेट दीड तासावर येणार आहे. त्यामुळे इंधनासह वेळेचीही बचत होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेला हा महामार्ग अति जलद महामार्ग आहे. हा महामार्ग डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच नाशिक मधील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या तालुक्यांना थेट जोडणार आहे. वाढवण बंदराची मोठी वाहतूक क्षमता लक्षात घेता हे बंदर राज्यातील सर्व जिल्ह्यांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

तवा ते भरविर महामार्ग हा त्यातीलच एक भाग आहे. या नवीन महामार्गामुळे 78 किलोमीटरच्या फेरा वाचणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असा हा महामार्ग असून जलद गतीसह सर्वांना परवडेल या दृष्टिकोनातून तो थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. मराठवाडा विदर्भाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने पावले उचलली असून 14 हजार रुपये कोटी खर्चाचा आणि 105 किलोमीटर लांबीचा सहा पदरी असलेला जलदगती महामार्गही तयार करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत वाढवण बंदर मार्गे समृद्धी महामार्गावर जायचे असेल किंवा तिथून यायचे असेल तर नाशिक येथील भरवीर आमने येथून मुंबई वडोदरा सुपरफास्ट हायवे वरून यावे लागते. त्यामुळे 80 ते 82 किलोमीटरचा प्रवास जास्तीचा होतो. त्यामुळे इंधनासह वेळही खर्ची जातो. हा प्रवास व अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन मार्गाच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केला गेला व त्यानुसार या महामार्गाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

महामार्गाच्या प्रकल्पासाठी होणार्‍या भूसंपादना करता हुडको संस्थेमार्फत 1500 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह 2528 कोटी 90 लाख रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हा महामार्ग डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, नाशिक अशा भागातून जाणार असल्यामुळे दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

या विकास प्रकल्प महामार्गाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच जलद गती महामार्ग असल्याने या भागातील प्रवास यासह वेळ व इंधनही वाचेल असे सांगितले जात आहे. हा महामार्ग थेट समृद्धीला जोडण्यात येणार असल्याने पालघर समृद्धी मार्गाची थेट जोडणी होईल. दळणवळणासह विविध उद्योग, कृषी उद्योग, स्थानिक बाजारपेठा यांना यांची थेट देवाण-घेवाण झाल्यामुळे प्रदेशाच्या विकासाला चांगली चालना मिळेल. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये आर्थिक सुबत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news